त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल येथील भवानी माता डोंगरावर केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेतून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे साकडे दिल्ली येथील पर्यटन मंत्रालयाच्या अपर सचिव मीनाक्षी शर्मा यांच्याकडे खासदार हेमंत गोडसे, त्र्यंबकेश्वर विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख मिथुन राऊत, शिवसेना त्र्यंबकेश्वरचे माजी तालुकाप्रमुख समाधान बोडके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे घातले. हरसूलजवळील नैसर्गिक वनौषधी जपणारा डोंगर म्हणून हरसूल येथील भवानी मातेच्या डोंगराकडे पाहिले जाते. एकेकाळी उजाड, ओसाड, निर्जल असा असणारा हा भवानीमातेचा डोंगर वनविभागाच्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीने आजमितीस हा डोंगर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ठेव्याने गजबजून निघाला आहे. ५२ हेक्टर क्षेत्र असलेला हा संपूर्ण डोंगर वनविभागाच्या मालकीचा आहे. येथे नवरात्रोत्सव काळात दर्या मित्रमंडळाच्या तसेच हरसूल परिसरातील नागरिकांच्या वतीने नवरात्रोत्सव काळात विविध उपक्र मांचे आयोजन केले जाते. यावेळी भवानी मातेच्या चरणी त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, नाशिकसारख्या ठिकाणांहून हजारो भाविक-भक्तांची मोठ्या प्रमाणात मातेच्या दर्शनासाठी गर्दी असते, परंतु मूलभूत सोयी-सुविधांअभावी येणाºया भाविक-भक्तांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. डोंगरावर जाण्यासाठी पायºया नसल्याने चिखल तुडवित जावे लागते. पिण्याचे पाणी, विजेची गैरसोय, भक्त निवास शेड यांसारख्या अनेक समस्यांची वानवा आहे. त्र्यंबकेश्वर तालुका हा निसर्गाने सुख समृद्धीने संपन्न असून, मोठ्या प्रमाणावर जंगल संपत्ती आहे. यात वनौषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या झाडांचे योग्यरीत्या संवर्धन व्हावे व पर्यटनाच्या दृष्टीने विशेष दर्जा देऊन वनजंगल परिसराचा विकास करावा याकरिता वनविभागाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात केली आहे.याशिवाय भवानी डोंगरासह तालुक्यात महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतांची रांग त्र्यंबकेश्वर तालुक्यातून गेली आहे. त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी, गंगाद्वार, अंजनेरीसह हरसूल या संपूर्ण पट्ट्यातील दºया-खोºया पर्वतराजी वनौषधी संपन्न आहेत. येथील कडे, कपारी गिर्यारोहकांचे आकर्षक स्थळे आहेत आणि याच दृष्टीने अंजनेरी येथे गिर्यारोहकांसाठी निवारागृह देखील उभारले आहेत, तसे निवारागृह तालुक्यातील अन्य डोंगर परिसरात देखील उभारावेत, अशी मागणी तालुक्यातील लोकांची आहे. यावेळी हरसूल सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण मेघे, सरपंच रावसाहेब कोठुळे, सुनील साबळे, धीरज पागी, अशोक उघडे, हेमराज पढेर आदी उपस्थित होते.हरसूलजवळील भवानी माता डोंगर हा नैसर्गिक वनऔषधी जपणारा डोंगर आहे. या मातेच्या डोंगरावर जाण्यासाठी कुठल्याही मूलभूत सोयी-सुविधा नाहीत, तसेच नवरात्रोत्सव काळात येथे हजारो भाविक मातेच्या चरणी लीन होतात. यावेळी अनेक अडचणींचा सामना भाविक भक्तांना करावा लागतो. त्यामुळे या भवानी माता डोंगराला पर्यटनस्थळ घोषित करून मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. - समाधान बोडके, माजी तालुकाप्रमुख, शिवसेना
भवानी माता डोंगर विकासासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:39 AM