नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या महामारीने देशाला ग्रासले असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी घरात राहूनच जयंती उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी बुद्धवंदना, ग्रंथवाचन, सोशल मीडियावरून विविध स्पर्धांसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणीही करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांचे आचरण करण्याची शपथही घेण्यात आली. कोरोनामुळे यंदा पारंपरिक मिरवणुका व भीमगीतांच्या मैफलींचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र, अनुयायांनी घरातील इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर भीमगीत ऐकत तसेच मोबाइलवर गाणी लावत आनंद घेतला. तसेच अनेक प्रबोधनकारांचे आॅनलाइन कार्यक्रम पाहत भीमजयंती कुटुंबीयांसमवेत साजरी केली. अनेकांच्या घरातून आणि गळ्यातून ‘भीम काळजाची तार गं माय, भीम निळाईच्या पार गं माय..!’ हे गीत ऐकावयास मिळाले. अनेक सामाजिक संघटनांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली.धामोडा येथे बुद्धवंदनायेवला : तालुक्यातील धामोडे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात साजरी करण्यात आली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन असल्याने भीमसैनिकांना घरात जयंती साजरी करावी लागली आहे. बाबासाहेबांनीच सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज कोरोनाशी संघर्ष करायचाय. त्यासाठी संघटित होऊया. सरकार, प्रशासन यांना मदत करूया आणि सर्वांनी घरातच थांबूया, कोरोनाला हरवूया हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपली खरी आदरांजली होऊ शकेल, असा संदेश यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे यांनी दिला, तर घराघरात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच गोडधोड जेवणाचा आस्वाद घेण्यात आला.मुखेड ग्रामपंचायतमुखेड : येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सरपंच भानुदास आहेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी छगन आहेर, रावसाहेब आहेर, ग्रामविकास अधिकारी बी. एल. मोहिते, संतोष आहेर, बिपीन धनराव, कृष्णराव आहेर, रितेश आहेर, महेश अनर्थे, केदारनाथ वेळंजकर, महेश भवर, संजय जिरे आदी उपस्थित होते.ननाशी आरोग्य केंद्रात प्रतिमापूजनननाशी : देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्र मणामुळे लॉकडाउन असल्याने ननाशी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत घरातच साजरी केली. ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, तर परिसरातील भीम अनुयायांनी आपापल्या घरातच जयंती साजरी करण्याला प्राधान्य दिले. रात्री १२ वाजता बुद्धवंदना घेऊन घरातच तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले.नांदूरवैद्य परिसरात भीमजयंतीचा उत्साहनांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच राहून साधेपणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक आदी ठिकाणी साजरी करण्यात आली. घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर महामार्गावरील गस्त घालणारे अधिकारी रवि देहाडे व सहकाऱ्यांनी कार्यालयात आंबेडकर यांना अभिवादन केले.वटार येथे डॉ.आंबेडकर यांना अभिवादनवटार : येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरी करण्यात आली. सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपसरपंच जितेंद्र शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. जिभाऊ खैरनार आदी उपस्थित होते.पेठ येथे घराघरांत प्रतिमापूजनपेठ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाउनमुळे घरातच साजरी करण्यात आली. लॉकडाउन असल्याने आंबेडकर जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्र म न घेता भीम अनुयायांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत पूजाविधी व प्रतिमापूजन करत बाबासाहेबांना अभिवादन केले.बल्हेगाव येथे प्रबोधनयेवला : लॉकडाउन व नियमांचे पालन करून बल्हेगावमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच मीरा कापसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपसरपंच हर्षदा पगारे, ग्रामसेवक गणेश रोकडे, प्रा. जितेश पगारे, रवि जमधडे, भाऊसाहेब सोमासे, सुभाष सोमासे, पोलीसपाटील राजेंद्र मोरे, गंगा मोरे, भाऊ माळी आदी उपस्थित होते. कोरोनाला हरवण्यासाठी घरीच राहून, वाचन करावे. घरातच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून जयंती साजरी करण्याचे आवाहन प्रा. जितेश पगारे यांनी केले. नितीन संसारे, रणजित संसारे, अरविंद संसारे, बाळासाहेब वाल्हेकर आदींनी प्रबोधन केले. बाबसाहेबांचे विचार निरंतर जिवंत आहेत याचे प्रतीक म्हणून घरोघर सायंकाळी दिवेही लावण्यात आले.