शहरातील केवळ गावठाण भागातच भोंदूगिरीचे ‘दुकान’ तेजीत आहे, असे नाही तर गंगापूररोडसारख्या उच्चभ्रू भागातसुध्दा कथित ज्योतिषी म्हणून घेणाऱ्या अशाच एका भोंदूबाबाचा भांडाफोड शनिवारी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सापळा रचून केला. गंगापूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर एका रोडफ्रंट इमारतीमध्ये संशयित गणेश महाराज याने फ्लॅटमध्ये आपले कारनामे सुरू ठेवले होते; मात्र याचा कुठलाही मागमूस पोलिसांना लागू शकला नाही हे विशेष!
दरम्यान, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने फ्लॅटवर धाड टाकत संशयित भोंदूबाबाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित भोंदूबाबाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
--इन्फो--
‘...उपाय नाही अशी समस्या नाही’
‘समस्या नाही, असा मनुष्य नाही, उपाय नाही अशी समस्या नाही, एकदा भेटून खात्री करा...’ अशी जाहिरात करणाऱ्या संशयित भोंदूबाबा गणेश महाराज याने जेहान सर्कलवरील सुमंगल अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील सहाव्या क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये आपले दुकान चालविले होते. हा भोंदूबाबा मूळ जळगाव जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
--इन्फो--
अंगलट केल्याचा महिलेचा आरोप
भोंदूबाबाने हातातील अंगठी तपासणी करण्याचा बनाव करत अश्लीलपणे शरीराला स्पर्श करून अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बनावट समस्याग्रस्त महिलेने केला आहे. यामुळे पोलिसांकडून याप्रकरणात चौकशी केली जात असून संशयिताविरुध्द बनावट महिला ग्राहकाच्या जबाबावरून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
--इन्फो--
पोलिसांची ‘कर्तव्य’तत्परता?
‘अंनिस’चे पदाधिकारी पोलीस ठाण्यात दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहोचले. तेथील अंमलदारांकडे त्यांनी भोंदूबाबाची तक्रार करत माहिती दिली. यावेळी कुठलेही वरिष्ठ अधिकारी हजर नाहीत, ते आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. वरिष्ठांच्या प्रतीक्षेत तासाभराचा वेळ उलटला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आगमनानंतर पोलीस पथक कारवाईसाठी निघाले. यावरून जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे पोलिसांमध्ये असलेले गांभीर्य चव्हाट्यावर आले.
--कोट--
संशयित भोंदूबाबाच्या जाहिरात वाचल्यानंतर अंनिसच्या महिला कार्यकर्त्याला बनावट महिला ग्राहक बनवून त्याच्याकडे पाठविले. यावेळी भोंदूबाबाने ५० हजारांची मागणी एका पूजेसाठी केली. अंधश्रध्देतून दैवी तोडगा संततीसुखावर महिलेला सांगितला. तसेच या महिलेसोबत गैरवर्तन करत अश्लील कृत्य करण्याचाही भोंदूबाबाकडून प्रयत्न झाला. यानंतर आम्ही पुरावे घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात पोहोचलो.
- डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस, अंनिस
--
070921\07nsk_46_07092021_13.jpg~070921\07nsk_47_07092021_13.jpg
भोंदूबाबाला ताब्यात घेताना पोलीस. भोंदूबाबाला पोलीस ठाण्यात आणताना पोलीस अधिकारी. ~भोंदूबाबाला ताब्यात घेताना पोलीस. भोंदूबाबाला पोलीस ठाण्यात आणताना पोलीस अधिकारी.