सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने घरातील व्यक्ती उन्हाळ्यामुळे घराबाहेर झोपलेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दापूर येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून काम करणारे शरद रामनाथ गोफणे यांचे गावातच रामोशी गल्लीत घर आहे. शरद गोफणे हे पत्नी रंजना व मुलगा अविनाश यांच्यासह घराबाहेर झोपले होते. पहाटे घरातून धूर येऊ लागल्याने त्यांनी आरडाओरड केला. अचानक स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराचे पत्रे उडाले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारीच असलेली कूपनलिका सुरु करुन आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. घरातील रोख ७० हजार रुपये, सोन्या-चांदीचे दागिणे, कपाट, सोफासेट, टीव्ही, धान्य व संसारपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गोफणे यांच्या घराजवळच दहा-बारा घरे होती. सुदैवाने कूपनलिकेच्या पाण्याने आग आटोक्यात आल्याने परिसरातील घरांना नुकसान झाले नाही. तलाठी जे. यू. परदेशी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यात गोफणे यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने गोफणे कुटुंबिय घराबाहेर झोपलेले असल्याने अनर्थ टळला. सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आली.
दापूर येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 3:41 PM