लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी पदभार घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन योजनांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, नाशिक तालुक्यातील जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दाखल रुग्णांची विचारपूस करण्याबरोबरच ग्राम बालविकास केंद्रात असलेल्या कुपोषित बालकांची वजने घेऊन त्यांची निगा राखण्याच्या सूचना केल्या आहेत.
गेल्या महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार घेतल्यानंतर एस. भुवनेश्वरी यांनी साधारणत: महिनाभर कार्यालयात बसूनच सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेऊन कामकाजाची पद्धत जाणून घेतली. पदभार घेतानाच भुवनेश्वरी यांनी शिक्षण व आरोग्याच्या विषयावर प्राधान्याने काम करण्याचे तसेच अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी थेट गावोगावी जाऊन पाहणी करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी आता आठवड्यातून तीन दिवस गावोगावी भेटी देऊन पाहणी व अडचणी समजून घेण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात नाशिक तालुक्यातील जातेगावपासून करण्यात आली. जातेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन भुवनेश्वरी यांनी रुग्णांची विचारपूस केली, त्याचबरोबर स्तनदा माता व गर्भवती महिलांना शासनाच्या आरोग्य योजनेेंतर्गत लाभ मिळतो का याची माहिती घेतली. आरोग्य व्यवस्थेतील आॅनलाइन प्रणालीवर दैनंदिन माहिती भरली जाते किंवा नाही याचा आढावा घेऊन आरोग्य केंद्रातील स्वच्छता व सूचना, मार्गदर्शक फलक पाहून समाधान व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आठवण म्हणून वृक्षलागवड केली. त्यानंतर अंगणवाडी व बाल ग्राम विकास केंद्रांना भेट दिली. बाल केंद्रात ९ कुपोषित बालके दाखल असून, या बालकांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांची वजने केली व स्वत: त्यांना पोषण आहार भरविला. बाल केंद्रात बसण्यासाठी खुर्ची-टेबलची व्यवस्था नसताना भुवनेश्वरी यांनी चक्क जमिनीवर ठाण मांडले. कुपोषित बालकांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाºया योजनांची माहिती जाणून घेत, त्याची उपलब्धतेची खात्री केली. त्याचबरोबर जातेगावच्या प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांच्या दप्तरची तपासणी केली व त्यांच्याकडून पाढे म्हणवून घेतले. हातात खडू घेत भुवनेश्वरी यांनी फळ्यावर लिहिले व त्याचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले. शाळेची पाहणी केल्यानंतर जातेगाव ग्रामपंचायतीला त्यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यांच्या समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे उपस्थित होते.