Manoj Jarange Chhagan Bhujbal Yeola: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आमने-सामने आल्याने येवल्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनोज जरांगे पाटील येवल्यातील शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी पडली. भुजबळ समर्थकांनी मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप जरांगे समर्थकांनी केला. जोपर्यंत छगन भुजबळ माफी मागत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेत जरांगे समर्थकांनी महामार्गावरच ठिय्या दिला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
मनोज जरांगे एका कार्यक्रमानिमित्त येवल्यात आले होते. परत जाताना त्यांनी नुकत्याच उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीला भेट दिली. जरांगे यांच्याबद्दल भुजबळ समर्थकांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप मनोज जरांगे समर्थकांनी केला. त्यानंतर शिवसृष्टीत असलेल्या भुजबळ समर्थकांना बाहेर काढण्याची मागणी करत जरांगे समर्थक आक्रमक झाले.
समर्थकांकडून पोस्टर फाडण्यात आले
त्यानंतर भुजबळ आणि जरांगे समर्थक आमने-सामने आले. दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. भुजबळ समर्थकांनी मनोज जरांगेंचे पोस्टर फाडल्याचा आरोप करत जरांगे समर्थकांनी भुजबळांचेही पोस्टर फाडले.
दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जरांगे समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर जरांगे समर्थक महामार्गावर जाऊन बसले. जोपर्यंत छगन भुजबळ माफी मागत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, अशी भूमिका जरांगे समर्थकांनी घेतली.
मनोज जरांगे आले अन्...
ज्या ठिकाणी मराठा आरक्षण समर्थकांनी ठिय्या दिला होता, तिथे मनोज जरांगे पाटील आले. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज चांगला दिवस आहे. त्यामुळे गोष्ट सोडून द्या. लोकांना वेठीस का धरायचं. राज्यात शांतता आहे आणि शांतता राहू द्या. छोटा भाऊ म्हणून सोडून द्या. आता एका मिनिटात रस्ता रिकामा करा", असे मनोज जरांगे कार्यकर्त्यांना म्हणाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.