येवला : महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.
येथील राधाकृष्ण लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, सत्ता असली आणि नसली काय, येवलेकरांचे प्रेम नेहमी आहे. हे कधी कुणी हिरावून घेऊ शकत नाही. सत्ता बदलली तरी येवल्याचा विकास कधीही थांबू देणार नाही.
नव्याने स्थापन झालेल्या सरकारने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिली. मी लोकप्रतिनिधींना सम प्रमाणात निधी द्या, त्यांच्या मागण्यांनुसार कामे करा, असे आदेश दिले होते. नाशिकच्या विकासात खीळ बसू नये म्हणून ऑनलाइन बैठका घेतल्या. आता केवळ नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यातील जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात आपण मंजूर केलेली कामे पूर्ण होतील. यातील कुठलेही काम रद्द होणार नाही, असा विश्वासही भुजबळ यांनी दिला. शिवसेना जरी अडचणीत आली असली तरी पवार साहेब व सर्व महाविकास आघाडी सरकारमधील घटक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन त्यांना आधार द्यावा, असे भावनिक आवाहनही भुजबळ यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, ॲड. बाबासाहेब देशमुख, जयदत्त होळकर, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, हुसेन शेख, महेंद्र काले, भाऊसाहेब भवर, प्रकाश वाघ, मोहन शेलार, अकबर शहा, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. श्रीकांत आवारे, दत्तात्रय रायते, भाऊसाहेब बोचरे, दत्तात्रय डुकरे, प्रसाद पाटील, साहेबराव आहेर, अनिल सोनवणे, ज्ञानेश्वर कदम, विलास गोऱ्हे, बाळासाहेब दाणे, सचिन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इन्फो
ईडीच्या धाकापोटीच अनेकजण भाजपसोबत
अनेक जण ईडीच्या धाकापोटीच भाजपासोबत गेले असल्याचे भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन केले असून, अनेकांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी असे कोणालाही वाटत नसून बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना संपावी, असे मलाही वाटत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.