नाशिक : छगन भुजबळ यांना भाजपा सरकारमुळेच तुरुंगात जावे लागले आणि याच सरकार पक्षातील मंत्री आता त्यांना भेटायला जाताहेत हे आश्चर्यचकित करणारे आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल यांना भुजबळ-मुंडे भेटीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी छगन भुजबळ यांची पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन घेतलेली भेट ही वैयक्तिक भेट असून, याबाबत राष्ट्रवादी पक्षातर्फे स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही. ओबीसी संघटनेसाठी मुंडे आणि भुजबळ यांनी सुरुवातीपासूनच चांगले काम केले आहे. ओबीसी नेतृत्व उभारणीस गोपीनाथ मुंडे यांचादेखील महत्त्वाचा वाटा होता, त्यामुळे ही भेट वैयक्तिक आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे स्वच्छ चारित्र्याचे नेते असून, ते न्यायालयीन चौकशीतून निर्दाेषपणे सुटतील, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त करत भुजबळ यांच्या अटकेबाबत सविस्तर बोलणे टाळले.देशात गाजत असलेला कांदाप्रश्न नवीन नसून शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांची खोल तळापर्यंत जाऊन अंमलबजावणी केली आहे. आताचे सरकार वेळीच निर्णय घ्यायला कुचकामी ठरत असल्याचेही पटेल यांनी यावेळी सांगितले. राज्यभरात मराठा समाजातर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत राष्ट्रवादी पक्षाची वेगळी भूमिका नाही, परंतु मराठा समाजाला भेडसावणारे प्र्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. विद्यमान सरकारने सत्तेत येण्याआधी अनेक आश्वासने दिली होती, त्यांची पूर्तता होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य संवाद साधून हा प्रश्न समन्वयाने सोडवण्याची आवश्यकता असल्याचेही पटेल यांनी यावेळी नमूद केले. सीमेवर जवान शहीद होत असताना देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे सांगत सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
तुरुंगात टाकणारेच आता भुजबळांच्या भेटीला
By admin | Published: September 23, 2016 1:53 AM