नाशिक : भुसावळ पोलीस ठाणे हद्दीत गावठी कट्ट्याद्वारे एकावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत फरार झालेल्या गुन्हेगाराला नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या. गणेश लक्ष्मीनारायण तल्लारे (रा.भुसावळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, भुसावळ येथे आदित्य संजय लोखंडे या युवकावर ९ जुलै रोजी संशयित गणेश याने गावठी पिस्तूलमधून गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरूध्द भुसावळ पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. घटनेनंतर गणेश हा भुसावळमधून फरार झाला. भुसावळ पोलिसांनी माहिती घेतली असता तो नाशिकमध्ये गेल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी गुन्हे शाखा युनीट-१चे पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना याबाबत माहिती देत कारवाईची मागणी केली. वाघ यांनी तपासचक्रे फिरवून फरार संशयित गणेशचा माग काढण्यास सुरूवात केली. सहायक निरिक्षक सचिन खैरनार, हवालदार रविंद्र बागुल, प्रवीण कोकाटे, विशाल काठे, नाझीम पठाण यांचे पथक त्याचा शहर व परिसरात शोध घेत होते. दरम्यान, पंचवटी परिसरातील राजपालनगर, मखमलाबादनाका येथे एक स्विफ्ट डिझायर कार संशयास्पदरित्या आढळून आली. पथकाचे पोलीस वाहन कारजवळ येताच कारमध्ये बसलेल्या इसमांनी कार सुरू करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पथकाने पोलीस वाहनाद्वारे त्यांची स्विफ्ट कार सिनेस्टाईल रोखली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ खाली उतरून चालकास स्विफ्टमधून बाहेर काढले. त्याने स्वत:ची ओळख सांगितली असता हाच शस्त्रांस्त्रांसह भुसावळमध्ये दरोडा टाकून गोळीबार करत फरार झालेला गुन्हेगार असल्याची खात्री पटली. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. स्विफ्ट कार (एम.एच०२ सीडी ०७३७) आणि १८हजारांचे दोन मोबाईल जप्त केले. जप्त मुद्देमालासह संशयित गणेश यास पुढील कारवाईकरिता भुसावळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
भुसावळमध्ये गोळीबार करणाऱ्यास नाशकात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 1:35 PM
पंचवटी परिसरातील राजपालनगर, मखमलाबादनाका येथे एक स्विफ्ट डिझायर कार संशयास्पदरित्या आढळून आली.
ठळक मुद्देपंचवटीत शिताफीने कारसह घेतले ताब्यात