नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तानाजी नाठे रात्री १२ वाजता कामावरून घरी परतत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. नाठे यांनी बिबट्याशी काही काळ संघर्ष करत आपली सुटका करत आपला जीव वाचविण्यात यश मिळवले आहे.गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीतील मॉस्ड्रॉफर कंपनीत कामाला असलेले तानाजी नाठे हे राञी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत असतांना अचानक दबा धरु न बसलेल्या बिबट्याने नाठे यांच्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यात ते दुचाकीवरून खाली पडले असता बिबट्याने पुन्हा त्यांच्याकडे धाव घेत हल्ला दोन्ही हातांना पंजाने जखमा केल्या आहेत.नाठे यांनी हिंम्मत न हरता काही काळ आपल्या हातात असलेल्या जेवणाच्या डब्याने बिबट्याशी संघर्ष करत आपला बचाव केला. डोक्यामध्ये हेल्मेट असल्यामुळे असून त्याच्या हल्ल्यांपासून आपली सुटका करण्यात नाठे यांना यश आल्याचे यावेळी सांगितलेÞ. सदर घटनेची माहिती वनविभागाला दुरध्वनीवरून दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहत परिसरात याआधी देखील बिबट्याने येथील जाधव वस्ती, तानाजी नाठे यांच्या शेतवस्तीवरील ठिकाणी गायी, वासरे, कुत्री आदी प्राण्यांवर हल्ला चढवत फडशा पाडला होता.मागील काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.
गोंदे दुमाला येथे कामगारावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 2:04 PM