लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प लॅमरोडवरील ओझरकर बंगला व जमाल सेंआॅटोरियाममध्ये बिबट्याचे दर्शन झाले. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी बादल उन्हवणे व सामाजिक कार्यकर्ते रमेश गिते यांनी त्वरित वनपरिमंडल अधिकारी मधुकर गोसावी यांना ही बाब काळविल्यानंतर अधिकारी व वन कर्मचारी यांनी या भागाची पाहणी केली. बिबट्याचे सातत्याने दर्शन होण्यामुळे याच भागात तो वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जमाल सेंआॅटोरियामचा दहा एकर परिसर पूर्ण जंगलमय झाले असून, आतमधील सर्व बंगले व जागा निर्मनुष्य आहे. गेल्या तीस वर्षांपासून तेथील कर्मचारी बादल उन्हवणे यांचे कुटुंब राहत आहे. तीस वर्षांत झाडांचे जंगल वाढल्याने व दोन्ही बाजूस नाले असल्यानेच बिबट्याचा संचार वाढला असल्याचे वनाधिकारी मधुकर गोसावी व गोविंद पंढरे यांनी सांगितले. बिबट्याने लॅमरोडवरील नक्षत्र सोसायटीच्या आवारात दोन दिवसांपूर्वी एका कुत्र्याची शिकार केल्याचे ही समजते तसेच वडनेररोडवरील पंपिंग स्टेशनजवळील त्र्यंबक पोरजे यांच्या मळ्यातही बिबट्याने एका वासराला ठार केले आहे. बेलतगव्हाण येथील पाळदे मळा भागात ही बिबट्याचे दर्शन झाल्याने व वन विभागाने पिंजरा लावला आहे. दारणा नदीपलीकडील गावांमधील नानेगाव, शिंदे, पळसे आदी भागातील ऊसतोड झाल्याने तो संपूर्ण परिसर मोकळा झाला आहे. त्यामुळे बिबट्याने आपला मोर्चा जुनी स्टेशनवाडी, रोकडे मळा, चौधरी मळामार्गे रेल्वेलगतच्या लॅमरोडसमोरील भागात भक्ष्याच्या शोधासाठी निवडला आहे. नानेगावलगतच्या भागात संपूर्ण अंधाराचे साम्राज्य असल्याने मळे विभागातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत. पिंजरा लावण्यासाठी वनविभागास अर्ज करावा लागेल, असे गोसावी यांनी सांगितले. वनविभागाकडे पिंजरे आणि मनुष्यबळ कमी असल्याने पिंजरा एक व बिबटे तीन अशी परिस्थिती आहे.