नायगाव - सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यात बिबट्यांच्या टोळक्यांचा मुक्त संचार वाढल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नायगाव व पिंपळगाव निपाणी शिवारात बिबट्यांच्या टोळक्यांचा मुक्त संचार वाढला आहे. पिंपळगाव येथील कैलास नारायण बोडके यांच्या तळवाडे रोडवरील वस्तीवर शनिवारी रात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली . विराज नाईक यांच्या वस्तीवर दोन बिबट्यांचे अनेकांना दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडा भरात अनेक शेतकऱ्यांना दिवसा शेतात पाणी भरत असतांना बिबट्या दिसल्याची अनेकांनी सांगितले आहे. सध्या शेतात रब्बी पिकांच्या विविध कामांची लगबग सुरू आहे.अशातच बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतक-यांबरोबर मजुरांमध्ये बिबट्याची भिती निर्माण झाली आहे. दरम्यान रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नायगाव - सोनगिरी - वडझिरे त्रिफुलीवर बिबट्याचे अनेकांना दर्शन झाल्याने नायगाव ग्रामस्थांमध्ये भीती व्यक्त होत आहे. बिबट्याच्या टोळक्यांचा या दोन्ही गावांमध्ये मुक्त संचार वाढला असल्याने पशुपालक व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने दोन्ही शिवारात वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी पिंपळगाव विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष डाँ.आर.आर.बोडके यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
नायगाव खोऱ्यात बिबट्यांचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 4:37 PM