नाशिक : दिंडोरीरोडवरील मेरी (तारवालानगर) परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे अखेर निष्पन्न झाले असून, वनविभागाला बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. मंगळवारी दुपारी मेरी जलविज्ञान प्रकल्पाच्या जंगलात मेलेले श्वान तसेच जवळच बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. बिबट्याच्या भीतीने गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील नागरिक भयभीत आहेत.दोन दिवसांपूर्वी तारवालानगर परिसरात काही नागरिकांनी बिबट्या फिरताना बघितला होता. ज्या चारचाकी चालकाने बिबट्या बघितला त्याने तत्काळ वाहतूक शाखेच्या पोलिसांना माहिती कळविली होती. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना ही माहिती कळविल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी परिसरात दाखल झाले होते; त्यांनीदेखील पाहणी करून कोणताही पुरावा नसल्याने बिबट्याचा संचार नसल्याचा खुलासा केला होता.बिबट्याचा वावर असल्याने मेरी शाळेला सोमवारी शालेय प्रशासनाने सुटी जाहीर केली होती. मंगळवारी दुपारी परिसरात राहणाºया नागरिकांनी तसेच वनविभागाच्या कर्मचाºयांनीही पुन्हा परिसरात पाहणी केली असता मेरी जलविज्ञान प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत श्वानावर हल्ला करून ठार केलेले श्वानाचे पिल्लू व बिबट्याचे ठसे आढळून आल्याने परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.दोन दिवसांपूर्वी मेरीत बिबट्या असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत असल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता, मात्र आता जलविज्ञान प्रकल्पाच्या मोकळ्या पटांगणात मयत श्वानाचे पिल्लू व बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण अधिकच पसरले आहे.
श्वानाची शिकार करणाºया बिबट्याचे मेरीत आढळले ठसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 6:14 PM