वर्धा - महाराष्ट्र पोलीस व वायुदलाच्यावतीने नाशिक येथून काढण्यात आलेली ‘निरोगी आरोग्य व सुरक्षित प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा बुधवारी वर्ध्यात दाखल झाली. या सायकल यात्रेत वायुदलाचे व पोलीस दलाचे असे एकूण 20 जवान सहभागी झाले असून हे जवान नाशिक-नागपूर व नागपूर-नाशिक असा एकूण 1,500 किमीचा अंतर अवघ्या दहा दिवसात पूर्ण करणार आहेत.
या सायकल यात्रेत नाशिक पोलीसचे दहा जवान सहभागी झाले आहेत. 22 फेब्रुवारीला नाशिक येथून निघालेल्या या सायकल यात्रेने धुळे, भुसावळ, अकोला, अमरावती नागपूर असा प्रवास करीत बुधवारी वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सदर सर्व सायकलीस्टशी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी संवाद साधला. त्यानंतर पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी स्वत: या सायकलीस्टचा उत्साह वाढविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय ते वर्धा शहर पोलीस ठाण्यापर्यंत यात्रेत सहभागी होऊन सायकल चालविली.
शिवाय या सायकल यात्रेत प्रभारी पोलीस अधीक्षक (गृह) पराग पोटे, आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले आदींनी सहभागी होऊन ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश दिला. नाशिक येथून निघालेल्या या सायकल यात्रेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गिरमे, नंदु उगले, बाळकृष्ण वेताळ, सुदाम सांगळे, दिनेश माळी, किरण वडजे, संदीप भुदे, हर्षल बोरसे, एम.के. धुम, फुलचंद पवार तसेच देवळाली नाशिक वायुदलाचे संतोष दुबे, सुमित, नितीन पाटील, संजय, एस. ए. जाधव, रवींद्र, धीरज, मनजीत आदी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात या सायकलीस्टला पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी निरोप दिल्यानंतर सदर सायकलीस्ट पुढील प्रवासासाठी रवाना झालेत.
एसपी व एसडीपीओंनी चालविली सायकलऐरवी वातानुकुलीत कार अन् वातानुकुलीत दालनात कामकाज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सायकल चालविण्याचे काम फायदे आहेत हे पटवून देण्यासाठी स्वत: सायकल चालविली. वर्धेतील सदर अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून सायकलने शिवाजी चौक, सोशालिस्ट चौक असे मार्गक्रमण करीत वर्धा शहर पोलीस ठाणे गाठले. एसपीसह बडे पोलीस अधिकारी खुद्द सायकल चालवित असल्याने ही सायकल यात्रा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.