पंचवटी : मंगळवारच्या दिवशी गोदावरी नदीसह वाघाडी नाल्यालाही पूर आल्याने चारहत्ती पूल, काट्या मारुती मंदिर बाहेरील रस्ता या भागात अजूनही चिखल साचलेला आहे. पावसाच्या सरी अधून मधून कोसळत असल्याने या चिखलावरून दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याने वाहनधारक जखमी होत आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाने तत्काळ गाळ व चिखल स्वच्छ करण्याचे काम करणे गरजेचे होते, मात्र प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांनी स्वत:च जेसीबी तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ बाजू काढण्याचे काम केले. पावसामुळे रस्त्याच्या कडेला लोटलेला गाळ पुन्हा रस्त्यावर येत असल्याने दुचाकी वाहनधारक त्या गाळावरून जाताच वाहने घसरून पडत आहे. काट्या मारूती मंदिर, चारहत्ती पूल, गंगाघाट तसेच रामवाडी परिसरातील हनुमान मंदिर या रस्त्यावर असेच काहीसे चित्र असल्याचे दिसून येते. चिखलामुळे वाहने घसरण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, प्रशासन साचलेला गाळ व चिखल स्वच्छ करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)
दुचाकी घसरण्याच्या घटना
By admin | Published: August 06, 2016 1:01 AM