सिन्नर : शहर व तालुक्यातील विडी कामगार यांनी विविध प्र्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.सिन्नर तालुका विडी कामगार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चास बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कामगार चौकातून प्रारंभ करण्यात आल्या. विविध फलक हातात घेऊन घोषणाबाजी करीत नवापूल, गणेशपेठ, शिवाजीचौक, हुतात्मा स्मारक यामार्गे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा नेण्यात आला. विडी कामगार संघाचे तालुक्याचे जनरल सेक्रेटरी नारायण आडणे, नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डी. बी. जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली तहसीलदार नितीन गवळी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात शेकडो विडी कामगार व पेन्शनर्स सहभागी झाले होते.विडी कामगारांना कमीत कमी नऊ हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता लागू करावा, कोशियारी अहवालानुसार कमीत कमी ३ हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता लागू करावा, केंद्र शासनाने विडी बंडलवर ८५ टक्के जागेत धोकादायक चित्र छापण्याचा घेतलेला निर्णय रद्द करुन तो ३० टक्के जागेत छापण्याचा नवीन आदेश काढावा, तेलांगणा राज्यात धर्तीवर विडी कामगारांना १ हजार रुपये जीवन अभिवृत्ती भत्ता महाराष्टÑ शासनाने सुरु करावा, एक हजार विडीकरता किमान ३०० रुपये वेतन द्यावे, मुलीच्या विवाहाकरीता एक लाख रुपये कन्यादान योजना सुरु करुन त्यासाठी श्रम मंत्रालयाकडून निधी मिळावा, विडी कामगारांना चांगल्या प्रतीचे पानपुडे विडी मालकांकडून देण्यात यावे आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.यावेळी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात छोटेखाणी सभा पार पडली. त्यानंतर निवेदन देण्यात आले. कामगारांच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन तहसीलदार गवळी यांनी दिले.
सिन्नर येथे विडी कामगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 5:44 PM