- सुयोग जोशी लासलगाव : कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने सोमवारी (दि.२१) संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले. त्यामुळे काही काळ समिती आवारात गोंधळ उडाला होता. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत कांद्याला प्रति किलो ३० रुपये भाव देण्याची मागणी केली.
लासलगावी सोमवारी बाजार समितीचे दुपारपर्यंत पहिल्या सत्रात उन्हाळ कांद्याच्या ५३२ वाहनांचे लिलाव झाले. यावळी किमान भाव ५०० ते कमाल १८१२ रुपये तर सरासरी १४०० रुपये क्विंटल मिळाले. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ७४ हजार ७५८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ५०० ते कमाल २७२१ तर सर्वसाधारण १७२६ रूपये प्रती क्विंटल राहीले.
कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार रुपयांच्या जवळपास आल्याने शेतकरीकांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे लासलगाव बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव बंद पाडून बाजारभाव घसरणीचा निषेध व्यक्त करण्यात आला. कांद्याचे बाजार भाव न सुधारल्यास मंत्रालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी संघटनेने दिला.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांत सोमवारी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून गेल्या आठवड्यात कांद्याला प्रति क्विंटल सरासरी २५०० रुपये भाव मिळत होता. त्यात तब्बल १३०० ते १५०० रुपये पर्यंत घसरण होऊन आता कांद्याला सरासरी १००० रूपये इतकाच भाव मिळत आहे. कांदा कवडीमोल दरात विकला जात असल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत कांदयाला किमान प्रति किलो ३० रुपये भाव देण्याची मागणी केली अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढून कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे