मेशी : महावितरण कंपनीने शेतीपंप विजबिल वसुलीसाठी अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ चालू केला आहे.
बिल भरा नाहीतर डी. पी. बंद अशी सक्ती सुरु केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कोणताही विचार न करता, त्याची परिस्थिती न पहाता रोहीत्र बंद केला जातोय. वसुलीची एवढी जलद सेवा का? अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अनुदान जाहीर केलं, पंचनामे झाले. कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात वाहून गेला.सरकार अनुदान देणार मग कोणाचंतरी देणं देवू म्हणून बँकेत पन्नास हेलपाटे मारले, पण अनुदान आले नाही. शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी, वेळेवर मिळत नाही. गावात येणारा तलाठी, ग्रामसेवक, कृषिअधिकारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना किती तात्काळ सेवा देतो याचा जरा विचार करा एका दाखल्यावरील सहीसाठी महिना महिना हेलपाटे मारावे लागतात. अन् वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळल जातय. असे शेतकरी ओरडत आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीतर्फे रोहीत्र बंद करण्याच्या आदेशामुळे शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत.