NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून जागावाटपाचा तिढा अजूनही न सुटल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं आज जाहीर केलं आहे. "नाशिकच्या जागेबाबत मला पक्षनेतृत्वाकडून सांगून ३ आठवडे उलटून गेले आहेत. मात्र अजूनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे, समोरच्या पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले आणि ते जोरदारपणे कामालाही लागले आहेत. परिणामी महायुतीला नाशिकच्या जागेवर अडचण निर्माण होऊ शकते. हा डेडलॉक तोडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती आज पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी दिली आहे.
"साधारण होळीच्या सुमारास आमचे नेते अजित पवार यांनी मला देवगिरीवर बोलावून सांगितलं की, मी, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्ली इथं गेलो असता आम्ही आपल्या पक्षाचे नाशिकमध्ये जास्त आमदार असल्याने नाशिक लोकसभेची जागा मागितली. या जागेवर आम्ही आपल्याकडून समीर भुजबळ यांचं नाव सुचवलं होतं. मात्र अमित शाह यांनी सांगितलं की तिथे आपले उमेदवार छगन भुजबळ हे असावेत. तुम्हालाच तिथून लढावं लागेल. अजित पवारांनी सांगितल्यानुसार मी नाशिकमध्ये तयारी सुरू केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही तिथं दावा सांगितला. त्यामुळे अजूनही या जागेबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचा उमेदवार जोरात कामाला लागला असून त्यांचा प्रचारही पुढे गेला आहे. त्यामुळे महायुतीचं या जागेवर नुकसान होऊ शकतं. म्हणून मी निवडणुकीतून माघार घेत आहे," अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली आहे.
दरम्यान, नाशिकच्या जागेसाठी माझं नाव सुचवल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो, असंही भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजाभाऊ वाझे मैदानात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून रंगत होती. त्या अनुषंगाने मतदारसंघ पिंजून काढत करंजकर यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. विशेष म्हणजे कालच विजय करंजकर यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी अचानक राजाभाऊ वाझे यांना नाशिकची उमेदवारी जाहीर केली. नाशिकमध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत उमेदवारी मिळवलेले राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ साली ते सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. राजाभाऊ वाजेंना मोठा राजकीय वारसाही लाभला आहे. त्यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते . त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून १९६७ साली निवडून आल्या होत्या. तसंच राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील २००९ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर येथून लढवली होती. शिवसेनेत २०२२ साली झालेल्या फुटीनंतर नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र या फुटीनंतरही राजभाऊ वाजे हे मात्र ठामपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. आता लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊन उद्धव ठाकरे यांनी वाजे यांना निष्ठेचं बक्षीस दिल्याचं बोललं जात आहे.