नाशिक - विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघात आता वेगळं समिकरण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार या मतदारसंघाची जागा काँग्रेसला गेली, या जागेसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. पण, आज सुधीर तांबे यांनी अर्ज माघारी घेतला. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी आता अपक्ष अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे या निवडणुकीत मोठा ट्विट पाहायला मिळाला. याही पुढे जाऊन सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून भाजपकडे पाठिंबा मागणार असल्याचे म्हटले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात वेगळंच राजकारण पाहायला मिळालं. त्या पार्श्वभूमिवर सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तर, सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीसांचं आपल्यावर प्रेम आहे, असेही म्हटले
नवीन नेतृत्वाला संधी देण्याचं काम देवेंद्रजी करत असतात. देवेंद्रजीचं माझ्यावर प्रेम आहे, हे आपण महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे, त्यांनी मला पाठिंबा द्यावा, असं मला वाटतं. त्यासाठी, मी देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा मागणार आहे, ते मला पाठिंबा देतील, असा विश्वासही अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.
मी महाविकास आघाडीचाच उमेदवार
आपणच काँग्रेसचे उमेदवार असल्याचा दावा सत्यजित तांबे यांनी केला आहे. तसंच या निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले. "काँग्रेस पक्षातील पक्ष श्रेष्ठींचीही मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. पक्षानं मात्र निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. काही तांत्रिक अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला एबी फॉर्म मिळू शकलेला नाही. त्यामुळे मी दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेस पक्षाचा आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे. माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यानं मला अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचाच आहे, असेही सत्यजित यांनी स्पष्ट केले.
तर विचार करू - बावनकुळे
आमच्या पार्लमेंट्री बोर्डात चर्चा करुन आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवणार आहे, आमच्यापर्यंत अजुनही कोणीही पाठिंबा मागितलेला नाही. पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करु. ही निवडणूक आता अपक्ष उमेदवारांची आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.