-----
व्यापाऱ्याला शिवीगाळ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : निळगव्हाण शिवारातील एम. बी. शुगर फॅक्टरीच्या रस्त्यावर झाड तोडून रस्त्यात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दिग्वीजय अशोक बच्छाव रा. सोयगाव व जेसीबी चालकाविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सौरभ दिनेशकुमार लोढा या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यांच्या कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ झाड टाकून अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार व्यापारे करीत आहेत.
-----
भारनियमनामुळे शेतकरी वैतागले
मालेगाव : सध्या ग्रामीण भागात कांदा लागवड जोरात सुरू आहे; मात्र वीज वितरण कंपनीकडून सक्तीचे भारनियमन केले जात आहे. मजूर टंचाईवर मात करून शेतकरी कसाबसा कांदा लागवड करीत असताना वीज वितरण कंपनीकडून नाहक त्रास दिला जात आहे. ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.
-----
विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
मालेगाव : शहरात कोरोना आटोक्यात असला तरी नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. संसर्ग वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात असली तरी याबाबत शहरात गांभीर्य दिसत नाही. महापालिका आयुक्तांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. यासाठी पथकेही नियुक्त करण्याचे सांगितले होते; मात्र ही पथके कागदावरच काम करीत असल्याचे दिसून येत आहेत.
-----
प्लास्टिक कारखान्यांवर कारवाईची मागणी
मालेगाव : शहरात धोकेदायक प्लास्टिक कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. शहरातील प्लास्टिक उत्पादन घेणाऱ्या प्लास्टिक कारखान्यांवर घातक व धोकेदायक स्वरूपाचे प्लास्टिक येत आहेत. यामुळे शहर प्रदूषित होत आहे. अशा कारखाना मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
-----
एटीएममध्ये खडखडाटामुळे ग्राहक वैतागले
मालेगाव : शुक्रवारच्या नाताळच्या सुट्टी व त्यानंतर जोडून आलेल्या चौथा शनिवार व रविवारची साप्ताहिक सुटी अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे शहरातील सुमारे ५५ एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट दिसून आला. एटीएम सेवा केंद्र बंद असल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. विक एण्डला पैसे उपलब्ध झाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
-----