सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावर दातली शिवारात हॉटेल रिच जवळ दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होवून एक वृद्ध महिला ठार झाली. तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. पार्वताबाई गबाजी केदार (९०) रा. दातली असे मयत महिलेचे नाव आहे. तालुक्यातील दातली येथील रमेश सुकदेव केदार (२४) हे मंदा बाळू कातकाडे (५०) आणि पार्वताबाई गबाजी केदार यांना घेवून दुचाकीवर (क्र. एमएच १५ सीए. ८९६३) सिन्नरकडे जात असताना समोरून भरधाव आलेल्या रेसर दुचाकीने समोरून धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान पार्वताबाई केदार यांची प्राणज्योत मालवली. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप शिंदे करत आहेत. दरम्यान, सिन्नर येथील कानडी मळ्यात बारागावपिंप्री मार्गावर झालेल्या अपघातात मनेगाव येथील यश वामन डावखर (२०) हे जखमी झाले. सिन्नरकडून बारागावपिंप्रीकडे जाणाऱ्या छोटा हत्ती (क्र. एमएच १२ केपी ६०५२) ने दुचाकी (क्र. एम. एच. १५ डीपी ५१०९) ला जोराची धडक दिली. यात अपघातात डावखर हे जखमी झाले. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकींची समोरासमोर धडक होऊन वृध्दा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 2:30 PM