नाशिक : शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून मुरूम टाकला जात आहे, मात्र दोनच दिवसांत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरूम पुन्हा रस्त्यावर आला असून, त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेल्याचा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिला आहे. संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असली मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याचे त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आराेप करीत आहेत. मध्यंतरी आमदार फरांदे यांनी डेंग्यूच्या उद्रेकानंतरदेखील पत्र दिले होते आणि आताही त्याचवरून खड्ड्यांवरूनही त्यांनी पत्र दिले आहे. शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे. यात नाशिक शहरात खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे नमूद केल आहे. खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाचा वापर केला जातो आणि दोनच दिवसानंतर मुरूम बाहेर पडून पुन्हा खड्डे तयार होतात. विशेष म्हणजे मुरूम रस्त्यावर पसरून त्यावरून मोटारी घसरून अपघात हाेत असतात. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे काम सुरू असून, ठेकेदाराचा फायदा करून देणे हेच यामागे उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्वत: सर्व रस्त्याची पाहणी करून कामाचा दर्जा तपासावा, अशी मागणी आमदार फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.