नाशिक - महापालिकेच्या अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणा-या ३२ महिला बचत गटांची बिले जुलै २०१७ पासून रखडली असून प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात असल्याने बचत गटाच्या सदस्या घायकुतीला आल्या आहेत. दरम्यान, माजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक यांनी बचत गटांच्या सदस्यांसमवेत सोमवारी (दि.८) उपआयुक्तांची भेट घेऊन गा-हाणे मांडले.महापालिकेच्या ४१८ अंगणवाड्यांमधील १२ हजार बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम ३२ महिला गटांना देण्यात आलेले आहे. सदर महिला बचत गटांची मुदत जून २०१७ मध्येच संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागामार्फत नव्याने बचत गटांना ठेका देण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुन्याच बचतगटांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केलेला आहे. स्थायी समितीने सदर निविदा प्रक्रिया तत्काळ राबविण्याचेही आदेश महिला व बालकल्याण विभागाला दिले होते. परंतु, अद्याप नव्याने बचत गटांना ठेका देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. मात्र, जुन्या बचतगटांना मुदतवाढ देताना गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची बिलेही अदा केलेली नाही. त्यामुळे बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बिले मिळावीत म्हणून मुख्यालयात दररोज महिला बचत गटाच्या सदस्या चकरा मारताना दिसून येतात मात्र, त्यांना बिले काढण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे उत्तर देत टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे बचत गटाच्या सदस्या घायकुतीला आल्या आहेत. बिलेच मिळत नसल्याने सध्या उधारीवरच मालाची खरेदी केली जात असल्याचे बचत गटांच्या सदस्यांचे म्हणणे आहे.चार दिवसात बिले निघतीलजुन्या बचतगटांना मुदतवाढीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेमुळे विलंब झालेला आहे. याशिवाय, सदर बचतगटांना जीएसटी लागू होतो काय, याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते. परंतु, २० लाखांच्या आतील उलाढालीवर जीएसटी नसल्याने तो प्रश्न संपला आहे. आतापर्यंत ३२ पैकी २२ बचतगटांचे करारनामे प्राप्त झाले आहेत. येत्या तीन-चार दिवसात संबंधित बचतगटांची बिले काढून त्यांच्या खात्यावर जमा केले जातील. याशिवाय, दोन दिवसात नव्याने ठेका देण्याबाबतही निविदाही प्रसिद्ध केली जाणार आहे.- रोहिदास दोरकुळकर, उपआयुक्त, मनपा
नाशिकमधील अंगणवाड्यांतील बालकांना पोषण आहार पुरविणा-या बचतगटांची बिले सहा महिन्यांपासून रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 7:27 PM
महापालिका : आर्थिक अडचणींमुळे बचत गटाच्या महिला सदस्य घायकुतीला
ठळक मुद्देपोषण आहार पुरविणा-या ३२ महिला बचत गटांची बिले जुलै २०१७ पासून रखडलीमाजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक यांनी बचत गटांच्या सदस्यांसमवेत सोमवारी (दि.८) उपआयुक्तांची भेट घेऊन गा-हाणे मांडले