नाशिक : अरूणाचलप्रदेश मधील आर्मी भरती कार्यालयात १७ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सैनिक भरतीत मुळ शैक्षणिक कागदपत्रांसह आवश्यक ती कागदपत्रे सादर करून सैनिकपदासाठी भरती झालेल्या एका प्रशिक्षणार्थीने बनावट डोमिसाईल प्रमाणपत्र सादर केल्याचे पडताळणीत उघडकीस आल्याने उपनगर पोलीस ठाण्यात नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरूणाचल प्रदेश राज्यातील पश्चिम कमेंग जिल्ह्यात सैन्य भरती कार्यालयात २०१८साली सैनिकपदाची भरती करण्यात आली होती. यावेळी संशयितइमरान सलाउद्दीन (२१,रा.तेझु जि. लोहित, अरूणाचलप्रदेश) हा आपल्या मुळ शैक्षणिक व सरकारी कागदपत्रांची पुर्तता करून भरती झाला होता. त्याला सैनिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी नाशिकरोड तोफखाना केंद्रात पाठविण्यात आले होते. २४ मार्च २०१९ साली तो येथील केंद्रात दाखल झाला. त्यानंतर निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांची मुळ शैक्षणिक व सरकारी कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी अरूणाचल प्रदेश राज्यातील इमरानच्या जिल्हा लोहितच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले. या पडताळणीत त्याने सादर केलेले डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतची अधिकृत माहिती नाशिकरोड तोफखाना केंद्राला सदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर खात्री पटल्याने येथील लेफ्टनंट कर्नल यांनी प्रशिक्षक नायब सुभेदार निर्मल कुमार यांना संशयित इमरानविरूध्द भारत सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद देण्याचे आदेश दिले. कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात इमरानविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
बनावट कागदपत्रे सादर करत सैन्यात भरती झालेल्या प्रशिक्षणार्थीचे बिंग फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 5:10 PM
अरूणाचल प्रदेश राज्यातील पश्चिम कमेंग जिल्ह्यात सैन्य भरती कार्यालयात २०१८साली सैनिकपदाची भरती करण्यात आली होती.
ठळक मुद्दे२४ मार्च २०१९ साली तो येथील केंद्रात दाखल झालाडोमिसाईल प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले