संगमेश्वर : मालेगाव शहरातील डॉ. सुनीता दिलीप भामरे यांनी मालेगाव परिसरातील विविध पक्ष्यांची छायाचित्रे काढली असून, ‘पक्षी अंगणी उतरती’ या नावाने त्याचे प्रदर्शन येत्या २५ व २६ जानेवारीला येथे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. भामरे यांचा मूळ छंद चित्रकलेचा. वर्षभरापूर्वी ख्यातनाम पक्षिमित्र सलीम अली यांच्या पुस्तकातून पक्ष्यांची चित्रे रेखाटताना आपल्या आसपास कोणकोणते पक्षी असावेत याची उत्सुकता त्यांना लागली. प्रामुख्याने पुस्तकात दर्शविल्याप्रमाणे रंगीत पक्षी शोधण्याचे कुतूहल त्यांच्यात निर्माण झाले. त्यातून त्यांनी आपल्या आसपास निरीक्षण करण्यास प्रारंभ केला. डॉ. भामरे यांनी आपल्या घराच्या गच्चीवर विविध फुलझाडे लावून हिरवी बाग फुलविली आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये -जा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यातही प्रामुख्याने हिमालयात आढळणारा ‘हळद्या’ हा पक्षी स्थलांतर करून आपल्या घराच्या गच्चीत आल्याचा सुखद धक्काही डॉ. भामरे यांना बसला. अशा या पक्ष्यांची छायाचित्रे डॉ. सौ. भामरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यास सुरुवात केली. कॅम्परोड ते रावळगाव नाका परिसरात पहाटेच्या वेळी फिरताना प्रामुख्याने ही छायाचित्रे काढण्यात आलेली आहेत. याशिवाय मालेगाव परिसरातील अनेक पक्ष्यांची छायाचित्रेही त्यांनी काढली आहेत. त्यात दयाल, बुलबुल, किंगफिशर, सुगरण, खाटीक व कोतवाल अशी २० ते २२ प्रकारचे पक्षी त्यांना आढळून आले. या कृष्णधवल व रंगीत अशा पक्ष्यांच्या साधारण १०० ते १२५ छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन रविवार व सोमवार असे दोन दिवस भरविण्यात आले आहे. कॅम्परोड एलआयसी कार्यालयामागील आयएमए सभागृहात सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन होईल. सदर प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुनीता भामरे यांनी केले आहे. (वार्ताहर)
‘पक्षी अंगणी उतरती’ छायाचित्र प्रदर्शन
By admin | Published: January 24, 2015 11:14 PM