दिंडोरी : तालुका अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दिंडोरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन धडकला. दरम्यान, मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार पंकज पवार हे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, पुरवठा अधिकारी निरभवणे, गटशिक्षणधिकारी भास्कर कनोज, उपविभागीय भूमी अभिलेख अधिकारी काजळे, कृषी अधिकारी यांच्यासह सर्व विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी गेले. यावेळी अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसीलदार पंकज पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांनी आंदोलकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरूच राहणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कोट....
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी मी स्वत: सर्व विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली; परंतु त्यावर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन चालू ठेवण्याचा पर्याय अवलंबला असला तरी पुन्हा त्यांच्यासमोर जाऊन त्यांच्या मागण्यांवर पुन्हा चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.
- पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी
फोटो- २३ दिंडोरी मोर्चा
दिंडोरी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोर्चात सहभागी आंदोलक.