नाशिक : मित्राचा वाढदिवस असल्याने तो मोठ्या उत्साहात तयार होऊन मित्राच्या निमंत्रणाला मान देवून ‘बर्थ-डे’ बॉयसोबत डिनर करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आला. वाढदिवस असलेल्या मित्राने शक्कल लढवून त्या मित्राला ‘फ्रेश’ होण्याचा सल्ला दिला. मित्र फ्रेश होऊन बाहेर येताच ‘बर्थ-डे’ बॉयने त्याचे फोटोसेशन करण्याचा आग्रह मित्राकडे धरला. मित्राने स्मार्टफोन काढत काही फोटो ‘क्लिक’ के ले. यावेळी त्याने मित्राच्या गळ्यातील सोनसाखळ्या फोटोसेशनसाठी मागितल्या. वाढदिवसाच्या दिवशी कशाला मित्राला नाराज करायचे म्हणून या मित्राने ‘दिलदार’पणे सोनसाखळ्या काढून ‘बर्थ-डे’बॉयकडे सोपविल्या. यावेळी काही फोटो तसे क्लिक करून झाल्यावर त्याने बहाणेबाजी करत मित्राकडून घेतलेल्या सोनसाखळ्यांसह रेस्टॉरंटच्या आवारातून धूम ठोकली. त्यामुळे बर्थ-डे पार्टी या मित्राला चांगलीच महागात पडली आणि ‘दोस्त दोस्त ना रहा...’ असे म्हणण्याची वेळ ओढावली.घडलेला प्रकार असा, सोमवारी (दि.२६) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास समीर पांडुरंग मढवी (३६,रा.जेलरोड) यास बर्थ-डे बॉय संशयित सौमित राजन याने राहत्या घराजवळ येउन त्यास पार्टी देण्यासाठी एमजीरोडवरील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये सोबत घेऊन गेला. यावेळी राजन याने मन्चुरियन, पनीरचिली आणि कोल्ड्रिंक्सची आॅर्डर दिली आणि ‘माझा दुसरा मित्र येत आहे, तोपर्यंत तू फ्रेश होऊन ये’ असा ‘मैत्री’चा सल्ला दिला. समीरने ‘दोस्त का हुक्म सरआॅँखोपर’ असे मनोमनी म्हणत उठून फ्रेश होण्यासाठी गेला. फ्रेश होऊन आल्यानंतर राजन याने त्याचे फोटोसेशन करण्याची मागणी समीरकडे केली. वाढदिवसाला मित्राला नाराज करायचे नाही, त्यामुळे त्याने त्याच्या मागणीनुसार फोटो काढण्यास सुरूवात केली. यावेळी राजनचा डोळा मात्र समीरच्या गळ्यात चकाकणाऱ्या दोन सोनसाखळ्यांवर होता. अल्पावधीतच त्याने समीरला त्याच्या गळ्यातील सोनसाखळ्या फोटोपुरत्या देण्यास सांगितल्या. समीरने पुन्हा त्याच विचाराने आपल्या सोनसाखळ्या काढून त्यास सोपविल्या. काही फोटो क्लिक झाल्यानंतर राजन याने बहाणा करून रेस्टॉरंटमधून बाहेर येत आलेल्या वाहनाने सोनसाखळ्या गळ्यात घालूनच धूम ठोकली. बराच वेळ होऊनही राजन पुन्हा आला नाही, हे लक्षात आल्यानंतर समीरने रेस्टॉरंटच्या परिसरात त्याचा शोध घेतला मात्र संशयित राजन हा घटनास्थळावरून आपली फसवणूक करून फरार झाल्याची त्यास खात्री पटली. त्याने तत्काळ जवळचे सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला. यावेळी पोलीसदेखील अवाक् झाले. बर्थ-डे पार्टी चांगलीच भोवल्याचे समीरला जाणीव झाली. त्याने संशयित राजनविरूध्द १ लाख २० हजार रूपये किंमतीच्या सोनसाखळ्यांचा अपहार केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करत संशयिताचा शोध सुरू केला आहे.
‘बर्थ-डे बॉय’ने पार्टीला बोलावून आपल्या मित्रालाच लावले ‘चंदन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 3:14 PM
बर्थ-डे पार्टी या मित्राला चांगलीच महागात पडली आणि ‘दोस्त दोस्त ना रहा...’ असे म्हणण्याची वेळ ओढावली.
ठळक मुद्दे‘दोस्त दोस्त ना रहा...’ असे म्हणण्याची वेळर्थ-डे पार्टी चांगलीच भोवल्याचे समीरला जाणीव वाढदिवसाला मित्राला नाराज करायचे नाही...