नाशिक - कोरोनाच्या सावटातही शहरात नाताळाचा सण जल्लोषात साजरा करण्यात येत असून, रात्री बारा वाजताच्या सुमारास शहरातील विविध चर्चमध्ये निवडक ख्रिस्ती समाजबांधवांच्या उपस्थितीत प्रभू येशू यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आणि रात्रीच्यावेळी संचारबंदीचे आदेश लागू असल्याने सर्व ख्रिस्ती बांधवांना एकत्र येऊन चर्चमधीस जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होता आले नाही. त्यामुळे बहुतांश समाजबांधवांनी घरीच कुटुंबीयांसमवेत राहून प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा केला.
नाशिक शहरात शुक्रवारी (दि.२५) ख्रिसमसचा जल्लोष पाहायला मिळाला. शहरातील सर्व चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कोरोनामुळे निर्बंध लागू असल्याने ख्रिस्ती समाजबांधवांनी फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळत शक्य होईल त्या चर्चमध्ये प्रार्थना केली. तर बच्चे कंपनीने घरीच राहून आपल्या लाडक्या सांताक्लॉज आजोबांचे स्वागत केले. या सांताक्लॉजची भूमिका कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती साकारताना दिसून आले.
कोरोनाच्या संकटकाळातही ख्रिसमसचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील सर्व चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी गर्दी करू नये, यासाठी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रात्री ९ वाजताच काही प्रमुख चर्च बंद करण्यात आले होते; मात्र त्यामुळे त्याचा ख्रिसमसच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. शुक्रवारी (दि.२५) दिवसभर ख्रिस्ती बांधवांनी गटा गटाने प्रभू येशुंचे दर्शन घेत सर्व चर्चमध्ये आणि ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी कॅरल सिंगिंग करत एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
इन्फो
बाजारपेठेत खरेदीचा उत्साह
ख्रिसमस सणामुळे शहरातील बाजारपेठही ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती. ख्रिस्ती बांधवांनी तोंडावर मास्क लावून विविध वस्तूंच्या खरेदीवर भर दिला जात आहे. लहानग्यांसाठी आकर्षक भेटवस्तू खरेदी करतानाच बाजारात सांताक्लॉजची टोपी, चिमुकल्यांच्या सांताक्लॉजच्या पोशाखासाठी लागणारा विशिष्ट पद्धतीने बनविलेला ड्रेस ख्रिस्ती बांधवांनी खरेदी केले. आकर्षक जिंगल बेल, चांदण्या, ‘ख्रिसमस ट्रीचीही मोठ्या प्रमाणात खेरेदी केली.