नाशिक : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्याकडेला असलेल्या वटवृक्षावर शुक्रवारी (दि.१३) भरदिवसा रंगपंचमीच्या सुटीची संधी साधत अज्ञात लाकूडतोड्यांनी वटवृक्षावर सर्रासपणे इलेक्ट्रॉनिक कटर चालविल्याचा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आला आहे.वृक्ष संरक्षण अधिनियमांतर्गत बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. महापालिका हद्दीत वृक्षतोड अथवा वृक्षाची छाटणीसाठी मनपा उद्यान विभागाकडून लेखी परवानगी घेणे गरजेचे असते; मात्र तरीही कुठल्याहीप्रकारची परवानगी न घेता मनपा हद्दीत वृक्षांवर थेट इलेक्ट्रॉनिक कटर चालविला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. एकीकडे महापालिकेकडून ‘हरित नाशिक सुंदर नाशिक’ असे बिरूद मिरविले जाते, तर दुसरीकडे जुन्या डौलदार वृक्षांची सर्रासपणे भरदिवसा कत्तल होत आहे.पेठरोडवरील एका पेट्रोल पंपासमोर रस्त्यालगत असलेल्या वडाचे झाड अज्ञात लाकूड तस्करांच्या टोळीने उभे कापले. महिंद्र पीकअप जीप (एमएच १५ एफक्यू ००८७) उभी करून अज्ञात दोन ते तीन इसम वडाचे खोड कटरने कापून त्याचे सांगाडे जीपमध्ये भरताना व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून येते. याबाबतची माहिती मनपा उद्यान विभाग व पंचवटी पोलीस ठाण्याला काही जागरूक नागरिकांनी तत्काळ कळविली. त्यानंतर पंचवटी विभागीय कार्यालयातील उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधितांकडे वटवृक्षतोडप्रकरणी विचारपूस केली असता त्यांनी आपत्कालीन स्थितीचे कारण पुढे केले; मात्र कर्मचाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून, याबाबत संबंधितांकडे खुलासा मागविणारी नोटीस धाडली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे झाड कापण्यासंबंधी कुठलीही पूर्वपरवानगी मनपा उद्यान विभागाकडे मागितली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता मनपा उद्यान विभागाकडून याबाबत काय कारवाई केली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भरदिवसा पेठरोडला वटवृक्षावर चालविला कटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 3:13 PM
वृक्ष संरक्षण अधिनियमांतर्गत बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. महापालिका हद्दीत वृक्षतोड अथवा वृक्षाची छाटणीसाठी मनपा उद्यान विभागाकडून लेखी परवानगी घेणे गरजेचे असते
ठळक मुद्दे‘हरित नाशिक सुंदर नाशिक’ वडाचे झाड अज्ञात तस्करांच्या टोळीने उभे कापले.