येवला : शहरातील खड्डे बुजविण्यासाठी अनेकवेळा पालिकेला निवेदने देण्यात आली. त्यानंतर पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणाऱ्या येवला नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांचा हार, फुले व फेटा घालून वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरातील महाराणा प्रताप चौक, जुना नगरपालिका रोड, थिएटर रोड, मौलाना आझाद रोड यासह विविधी भागातील रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. वाहने, हातगाड्या यासह लहान-मोठ्या वाहनांचा वावर असलेल्या या रस्त्यांवर या खड्ड्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला आहे. नागरिकांना या रस्त्याने पायी चालणेदेखील मुश्कील झाले असल्याने वाहनांची काय अवस्था असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला शिवसेनेच्या वतीने खड्डे बुजविण्यासाठी निवेदने देण्यात आली होती. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने न. पा. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा वाढिदवस साजरा केला. याप्रसंगी रस्त्यावरील खड्ड्यांना हार फुले व फेटा घालून केक कापण्यात आला. उपस्थित बालकांना चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर संघटक धीरज परदेशी, शेरू मोमीन, अशोक मोहारे, संजय सोमासे, प्रमोद तक्ते, शाकीर शेख, हाफिज मोहम्मदआली अन्सारी, बंटी परदेशी, अतुल घटे, पप्पू भुसे, आत्मेश विखे, संजय आचारी, नितीन जाधव, सांजय शिंदे, पवन संत, आदित्य नाईक, प्रल्हाद कवाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.