नाशिक : अवघ्या दोन दिवसांवर वाढदिवस येऊन ठेपला असताना मोलमजूरी करणाऱ्या आई-बापाने आपल्या लहानग्यासाठी गोडधोड तयार करून भावी आयुष्यासाठी आशिर्वाद देण्याचा बेत आखला....मात्र नियतीला ते मान्य नव्हते. अवघ्या सात वर्षांचा चिमुरडा नेहमीप्रमाणे पाठीवर दप्तर घेऊन महापालिकेच्या शाळेत गेला. बुधवारी (दि.३१) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी वर्गातून बाहेर पडलेल्या अक्षयवर काळाने झडप घातली. शाळेजवळ सुरू असलेल्या एका खासगी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयामधील साचलेल्या पावसाच्या पाण्यात पडून अक्षयचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अवघे संतकबीरनगर हादरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शहरात लागोपाठ झालेल्या दोन शाळकरी मुलांच्या अपघाती मृत्यूने शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.संतकबीरनगर परिसरात आनंदवली महापालिका शाळा क्रमांक -१६चे दोन वर्ग चालविले जातात. पत्र्याच्या खोल्यांमध्ये भरणा-या या वर्गांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात अक्षय पंडीत साठे (७) हा चिमुकला अक्षर ओळखचे धडे गिरविण्याचा प्रयत्न करत होता. कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची. आई-वडील मिळेल ते मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह चालवितात. अक्षय त्यांचा मोठा मुलगा. त्याच्या पाठीवर दोन लहान चिमुकले, पत्नी असा पंडीत साठे यांचे लहानसे कुटुंब संतकबीरनगरमध्ये वास्तव्यास आहे.मुलगा सात वर्षांचा झाला म्हणून यावर्षी अक्षयला मोठ्या आनंदाने शाळेत आई-वडिलांनी दाखल केले. मुलगा शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवेल, असे स्वप्न बाळगण-या साठे कुटुंबीयांवर बुधवारी आभाळ फाटले. हसत-खेळत शाळेची पायरी चढलेला चिमुकल्याच्या मृत्यूची बातमी बुधवारी कानावर आली आणि आई-वडिलांच्या पायाखालून जमीन सरकली. मुलाच्या अचानकपणे झालेल्या मृत्यूने आईला मोठा हादरा बसला असून लाडक्या अक्षयच्या नावाने त्या माऊलीने जिल्हा शासकिय रूग्णालयात हंबरडा फोडला. या दुर्घटनेप्रकरणी महापालिका शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून मुख्याध्यापकाकडे लेखी जवाब शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी मागितला आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. पंचनामा करून बांधकाम सुरू असलेल्या जागेच्या मालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहे.
दोन दिवसांवर वाढदिवस : शाळेत गेलेल्या पहिलीच्या चिमुकल्यावर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 3:27 PM
शहरात लागोपाठ झालेल्या दोन शाळकरी मुलांच्या अपघाती मृत्यूने शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. संतकबीरनगर परिसरात आनंदवली महापालिका शाळा क्रमांक -१६चे दोन वर्ग चालविले जातात.
ठळक मुद्देया घटनेने अवघे संतकबीरनगर हादरले मुलाच्या अचानकपणे झालेल्या मृत्यूने आईला मोठा हादराबांधकामासाठी खोदलेल्या खड्डयामधील साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून मृत्यू