नाशिक : शहरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत झालेल्या बैठकीत बिटको रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत चर्चा झाली खरी, परंतु त्यावर या रुग्णालयाच्या खासगीकरणाचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी दिले आहेत.कोरोनाबाबत स्थायी समितीची शुक्रवारी (दि.११) झालेल्या विशेष बैठकीत सभापतींनी यासंदर्भात सूतोवाच केले. रुग्णालयाचे व्यवस्थापन तसेच एमआयआर, सिटी स्कॅनदेखील खासगीकरणातून चालविण्यास देणार आहे. त्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना कितपत उपयोग होईल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. शुक्रवारी (दि.११) झालेल्या बैठकीत स्थायी समितीच्या सदस्यांनी बिटको रु ग्णालयातील असुविधांबाबत तक्रारी केल्या. बिटकोत डॉक्टर, नर्ससह अन्य कर्मचाऱ्यांचे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपचारांबाबत आबाळ होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. बिटको रु ग्णालयात ५०० बेड सध्या उपलब्ध आहेत. ही संख्या एक हजार बेडपर्यंत नेण्याचे काम सुरू आहे. मात्र परिसरातील रुग्णालयात पुरेसे फिजिशियन नाही तसेच वैद्यकीय कर्मचारी दाद देत नाहीत, नगरसेवकांच्या सूचनांची दखल घेतली जात नाही असे सांगून सर्वांनीच तक्रारी केल्यानंतर सभापती गणेश गिते यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. एम्सच्या धर्तीवर वैद्यकीय सेवा देण्यासह कोरोनासााठी सुसज्ज पूर्ण क्षमतेने बिटकोत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश सभापती गिते यांनी दिले आहेत. या रुग्णालयात खासगी व्यवस्थापन सुरू करण्यात येणार असले तरी गरीब रुग्णांना प्राधान्य देण्यात येईल, असे गिते यांनी सांगितले.महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील विविध पदे रिक्त असून, त्यामुळेच अनेक सेवा सुविधांचा लाभ होत नाही. एमआरआय आणि सिटी स्कॅन चालविण्यासाठीदेखील मनुष्यबळाचा अभाव असल्याने या सेवा चालविण्यासाठीदेखील खासगीकरण करण्यात येणार आहे.
बिटको रुग्णालयाचे खासगीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 1:52 AM
शहरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत झालेल्या बैठकीत बिटको रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत चर्चा झाली खरी, परंतु त्यावर या रुग्णालयाच्या खासगीकरणाचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देगणेश गिते यांचे निर्देश : नगरसेवकांत आश्चर्य