लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण भागात तालुकास्तरावर पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोविडपश्चात रुग्णांची काळजीदेखील घेतली जाईल. मात्र, त्याचबरोबर आता कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तत्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोविडमधून बरे झाल्यानंतरदेखील रुग्णांनी काय काळजी घेण्यात यावी, याबाबत आरोग्य यंत्रणेने नागरिकांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करावी ज्यामुळे कोविडबाधित आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या रुग्णांमधील वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे शक्य होईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात दर दिवसाला १० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असून, ८४ मेट्रिक टन ऑक्सिजनसाठा उपलब्ध आहे. तसेच संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेता १८ हजार ५५० बेड्सदेखील जिल्ह्यात उपलब्ध आहेत. तसेच जिल्ह्यात कोविड चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टिनेदेखील नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.
इन्फो
बिटकोत ऑटोमॅटिक एक्स्ट्रॅक्शन मशीन
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार दैनंदिन कोविड चाचण्यांची संख्यादेखील वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. कोविड चाचण्यांचा तपासणी अहवाल त्याच दिवशी मिळण्यासाठी ऑटोमॅटिक एक्स्ट्रशन मशीनदेखील बिटको रुग्णालयात बसविण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे जिल्ह्यात ऑक्सिजनसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे टेस्टिंग लॅबच्या माध्यमातून जिल्ह्याबाहेरील यंत्रणावर अवलंबून न राहता आपल्या जिल्ह्यातच तपासणी अहवाल मिळू शकतील आणि या संकटकाळात आपण स्वत:च्या ताकदीवर सर्व चाचण्या करू शकू, असे नियोजन प्रशासनाने केले असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.