नाशिकरोड : ऐन रोगराईच्या काळात औषधांचा अपूर्ण साठा, खोकल्याच्या औषधाचा साठाच नसल्याने रुग्णांना दिला जाणारा नकार आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. फुलकर यांची गैरहजेरी असा सर्व कारभार गुरुवारी (दि.४) महापालिकेच्या सर्वात मोठ्या असलेल्या शिवसेनेच्या भेटीत उघड झाला. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे बिटको रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात गेल्या आठ दिवसांपासून खोकल्याच्या औषधांचा साठा संपला असल्याचे रुग्णांना सांगून परत पाठविले जात असताना प्रत्यक्षात मात्र रुग्णालयात साठा आढळला आहे. त्यामुळे रुग्णांना नाकारण्याचे कारण काय असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. त्याचप्रमाणे स्वाइन फ्लूची साथ गंभीर वळण घेत असताना अवघ्या चाळीस गोळ्याच शिल्लक असल्याचा गंभीर प्रकारदेखील उघडीस आला आहे.या प्रकारानंतर आता शुक्रवारी (दि.५) देखील अन्य रुग्णालयांमध्ये अचानक भेट देऊन पोलखोल करण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले. शहरातील स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि अन्य रोगराईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवकांनी बिटको रुग्णालयास गुरुवारी (दि.४) दुपारी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या विविध भागांना भेटी दिल्या. दुपारी ४ वाजता बाह्य रुग्ण विभागातील काही डॉक्टर वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्ण ताटकळत बसल्याचे निदर्शनास आले. मुळात रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी फुलकर हेच उपस्थित नव्हते. त्यांना नगरसेवक आल्याचे कळाल्यानंतर ते धावपळ करीत दाखल झाले. रुग्णांकडे केलेल्या तपासणीनंतर नगरसेवकांनी फार्मासिस्टकडे विचारणा केली असता त्यांनी खोकल्याचे औषध आठ दिवसांपूर्वीच संपल्याने रुग्णांना परत पाठवावे लागत असल्याचे सांगितले. मात्र डॉ. फुलकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मात्र साठा दाखवला. याबाबत फार्मसिस्टला कोणतीही माहिती नसल्याने आठ दिवस रुग्णांना परत पाठविले जात असल्याचे उघड झाले. यावेळी नगरसेवक सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, डी. जी. सूर्यवंशी, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत फुलकर आदींसह डॉक्टर, कर्मचारी, शिवसैनिक उपस्थित होते.अस्वच्छतेचा कळसरुग्णालयाची अत्यंत दुरवस्था झाली असून घाण, अस्वच्छता असल्याने रुग्ण बरे होतीलच कसे असा प्रश्न अजय बोरस्ते व विलास शिंदे यांनी उपस्थित केला आहे. अनेक विभागातील खिडकीच्या काचा फुटलेल्या होत्या. तसेच पंखे, ट्युबलाईट बंद असल्याने त्रास होत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या. रुग्णालयाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले असून, घाणदेखील साचलेली होती. पहिल्या मजल्यावर बाहेरील बाजूस लावलेले एसीचे मशीन हे घाण, पिशव्या, केरकचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे पाहणीत दिसून आले. यामुळे काही एसी बंद असल्याचे स्पष्ट झाले. या अस्वच्छतेबाबत नगरसेवकांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे वैद्यकीय कचरा आणि रक्त असलेले इंजेक्शन्स हे बेसीनमध्ये फेकून देण्यात आले होते त्याची शास्त्रोक्त निर्गत केली जात नसल्याचेदेखील उघड झाले.अखेर महिला रुग्ण दाखल झालीगंगाबाई उगले ही वृद्धा तापाने फणफणत असताना गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी येत आहे, परंतु दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती. तिची कैफियत ऐकल्यानंतर शिवसेना नगरसेवकांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा केली. नंतर तिला दाखल करून घेण्यात आले. चोर सोडून संन्याशाला शिक्षारुग्णालयातील काही खिडक्याच्या काचा फुटल्या असून पंखे, ट्युबलाईट, एसी बंद आहे. स्वच्छतेवरूनदेखील रुग्णालयाला प्रशासनाने धारेवर धरले. रुग्णालयाकडून बांधकाम, विद्युत विभागाला नादुरुस्त कामाबाबत कळविण्यात आले आहे. मात्र, त्या विभागाकडून वेळेत काम झाले नाही मात्र त्याचा त्रास रुग्णालय प्रशासनाला सोसावा लागला. स्वच्छतेकरिता साधनसामग्री कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने स्वच्छतेवर त्याचा परिणाम होत आहे, असे या रुग्णालयाच्या कर्मचाºयांनी सांगितले.
विशेष महासभा बोलवावीशहरात रोगराई भयंकर स्थितीत असून, महापालिका प्रशासनाला यात अपयश येत आहे. त्यामुळे महापौरांनी तातडीने विशेष महासभा बोलावून कार्यवाहीचे आदेश देणे गरजेचे आहे. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता