खर्जुल यांनी कर्मचारीवर्गाच्या तक्रारी, नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या. त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. बिटको रुग्णालयातील बेड आता कोरोनारुग्णांना टोकन पद्धतीने देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. रेमडेसिवर इंजेक्शनची बिटकोतही तीव्र टंचाई आहे. त्याबद्दलही अनेक तक्रारी होत्या. रेमडेसिवरचे योग्य पद्धतीने वाटप करावे, त्याचा काळाबाजार होत असेल तर तो थांबावा, अशी मागणी होती. ती लक्षात घेऊन रुग्णाचे नाव, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक तसेच सही घेऊनच रेमडेसिवर इंजेक्शन द्यावे, याबाबत रजिस्टर ठेवावे अशी सूचना खर्जुल यांनी केली. रुग्णाला रोज नाष्टा आणि जेवणाला विलंब होत होता. आता सकाळी ७ ते ८ या वेळेत नाष्टा व दुपारी ११ ते १ वेळेत जेवण देण्याचे बैठकीत ठरले. ऑक्सिजन पातळी ९५च्या पुढे जाऊनही काही रुग्ण ऑक्सिजन बेड पंधरा ते वीस दिवस अडवून बसले होते. अशा २५ रुग्णांची तपासणी करून त्यांना अन्यत्र हलविण्यात आले. टोकन नंबरप्रमाणेच रुग्णांना आता बेडचे वाटप केले जाणार आहे. नवीन रुग्ण रुग्णालयात येताच त्वरित त्याचा अर्ज भरून प्राथमिक उपचारासाठी सहा बेड राखीव ठेवण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मृतदेह त्वरित ताब्यात मिळावा यासाठी प्रत्येक मजल्यावर दोन कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश खर्जुल यांनी दिले.
(फोटो २६ बिटको)