नाशिक : महापालिकेत पूर्ण बहुमत प्राप्त करणाऱ्या भाजपापुढे आता सत्तापदांची वाटणी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सत्तापदांचा अधिकाधिक सदस्यांना लाभ मिळावा, यासाठी सव्वा वर्षासाठी महापौर-उपमहापौर पदांचा फॉर्म्युला महापालिकेत अंमलात आणण्याचा विचार भाजपात सुरू असून, त्यात नव्या-जुन्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौरपदासाठी सव्वा वर्षाचा ‘सत्यनारायण’ घालण्याच्या या फॉर्म्युल्यामुळे पाच वर्षांत दोनऐवजी चार सदस्यांना संधी लाभणार असून, राजकीय चौरंगावर कुणाच्या नावाने पूजा मांडली जाते, याकडे आता लक्ष लागून असणार आहे. महापालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला संपूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे. भाजपाने सर्वाधिक ६६ जागा मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. भाजपा सत्तारूढ होणार असल्याने पक्षातील ज्येष्ठांसह नवख्यांनाही आता सत्तापदांचे वेध लागले आहेत. पाच वर्षांत दोनदा महापौरपद व उपमहापौरपद, सभागृहनेतापद, गटनेतापद, पाच वेळा स्थायी समिती सभापतिपद, दोनदा शिक्षण समिती सभापतिपद, पाच वेळा महिला बालकल्याण समिती सभापतिपद आणि बहुमत असलेल्या पाच विभागांमध्ये दरवर्षी प्रभाग सभापतिपद आदि पदांची वाटणी करण्याचे आव्हान आता पक्षश्रेष्ठींपुढे असेल. त्यामुळेच महापौर-उपमहापौरपद हे अडीच वर्षांसाठी न ठेवता ते सव्वा-सव्वा वर्षांसाठी पदे बहाल करण्याचा फॉर्म्युला राबविण्याचा विचार भाजपात सुरू आहे. त्यास पक्षातील वरिष्ठ नेत्याने दुजोराही दिला आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित आहे. भाजपाकडे या प्रवर्गातून पाच उमेदवार निवडून आले आहेत.
भाजपा घालणार सव्वा वर्षाचा ‘सत्यनारायण’
By admin | Published: March 03, 2017 2:04 AM