नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाला भरती आली असली तरी यंदा या निवडणुकीत इच्छुकांनाही चांगले दिन आले आहेत. शिवसेना आणि भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मनसे आणि तेही नसेल तर अन्य छोट्या पक्षांकडून संधी मिळणार आहे. साहजिकच या निवडणुकीत छोट्या पक्षांचा चंचुप्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी स्थिती आहे. महापालिका निवडणुकीत यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती असून, त्यामुळेच सर्वच पक्षांना किमान दोन किंवा तीन सक्षम उमेदवार असले पाहिजे, यावर भर आहे. भाजपा आणि शिवसेनेकडे सुमारे दीड हजार इच्छुकांनी नावे नोंदवली असून, त्यांच्याकडे मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांकडून मोठ्या प्रमाणात उमेदवार दाखल झाले आहेत. त्यामुळे या पक्षांची अवस्था बिकट झाली असून, या पक्षांना अनेक प्रभागात उमेदवारच नाहीत. भाजपाकडे आणि शिवसेनेकडे असलेल्या इच्छुक उमेदवारांमुळे तीन दिवस मुलाखती चालल्या किंवा सुरू आहेत. परंतु अन्य पक्षांकडे एक ते दीड दिवसात सर्व इच्छुकांच्या मुलाखती संपल्या आहेत. त्यामुळे आता भाजपा आणि सेनेतून ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही, अशा नाराजांना शोधून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांना कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेलच, या शिवाय बहुजन समाज पार्टी, रिपाइंसह विविध आंबेडकरवादी पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेला दल, सरकार पक्षातील घटक पक्ष असलेले रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच अन्य पक्षांची आघाडी, विविध छोट्या पक्षांनी एकत्र येऊन केलेली पुरोगामी आघाडी तसेच हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, असे मोठ्या संख्येने पक्ष निवडणुकीत नशीब आजमावणार असून, अनेक पक्षांचे नाशिकमध्ये यापूर्वी काहीच अस्तित्व नव्हते, असे पक्षही आता नाशिकमधील प्रस्थापित कार्यकर्ते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या नाही तर त्या पक्षाकडून अशी बऱ्याच इच्छुकांना उमेदवारी मिळणार आहे. (प्रतिनिधी)
भाजपा-सेना हाऊसफुल्ल, अन्य पक्षांची शोधाशोध
By admin | Published: January 24, 2017 12:57 AM