पंचवटी : पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेना व भाजपा या पक्षांकडून उमेदवारी मिळावी यासाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्गातून इच्छुकांनी आपापल्यापरीने पक्षश्रेष्ठींकडे व्यूहरचना करण्यास सुरुवात केलेली आहे. अद्यापपावेतो कोणत्याही पक्षाकडून कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी इच्छुकांनी आपापल्यापरीने प्रभागात प्रचारयंत्रणा राबविण्याचे काम सुरू केले आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाकडून एका विद्यमान, तर एका माजी नगरसेवकाला उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातून उमेदवारीसाठी दोन्ही गटांतून जवळपास सात ते आठ इच्छुक असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून आहे. इतर मागास प्रवर्ग जागेसाठी माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यांनी दावा केला आहे. शिवसेनेचीही अशीच काहीशी परिस्थिती असून सर्वसाधारण जागेसाठी पाच तर इतर मागास प्रवर्गातून सहा अशा इच्छुकांनी दावा केला आहे. अनुसूचित जाती जागेसाठी महिला उमेदवारांत रस्सीखेच असून, शिवसेनेकडून तब्बल सात महिला उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून अनुसूचित जमाती महिला जागेसाठी उमेदवार निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार निश्चित होणे बाकी आहे. अशीच परिस्थिती भाजपाची असून, सर्वसाधारण व अनुसूचित जमाती महिला जागेसाठी उमेदवार निश्चित मानले असले तरी इतर मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती महिला जागेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये सेना-भाजपा या दोन प्रमुख पक्षातच लढत होणार असल्याचे दिसत असले तरी मनसे व अपक्ष उमेदवारी करणाऱ्या इच्छुकांमुळे मत विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
सेना-भाजपाच्या उमेदवारीसाठी चुरस
By admin | Published: February 02, 2017 1:04 AM