नाशिक : महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना व मनसेने तटस्थतेची भूमिका घेण्याचे जाहीर केल्याने भाजपा आणि कॉँग्रेस आघाडीतच सरळ सामना होणार आहे. महापौरपदासाठी भाजपाच्या रंजना भानसी, तर कॉँग्रेसच्या आशा तडवी, तर उपमहापौरपदासाठी भाजपाचे प्रथमेश गिते आणि राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या १४ मार्चला सकाळी ११ वाजता महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक होईल.महापौर - उपमहापौरपदासाठी गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, भाजपाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक १२.३० वाजेच्या सुमारास राजीव गांधी भवन येथे दाखल झाले. पंचवटीतील म्हसरूळ भागातून सलग पाचव्यांदा महापालिकेत निवडून आलेल्या रंजना भानसी यांनी महापौरपदासाठी तर माजी आमदार व माजी महापौर वसंत गिते यांचे सुपुत्र आणि तीन विद्यमान नगरसेवकांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले प्रथमेश गिते यांनी उपमहापौरपदासाठी भाजपाकडून अर्ज दाखल केला. भानसी व गिते यांनी नगरसचिव ए. पी. वाघ यांच्याकडे प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले. भानसी यांच्या अर्जावर उद्धव निमसे व अरुण पवार यांनी सूचक तर दिनकर आढाव व गणेश गिते यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.
भाजपा-कॉँग्रेस आघाडीत सामना
By admin | Published: March 10, 2017 2:20 AM