नाशिक : नानी दमण या केंद्रशासित प्रदेशातील भाजपचे नगरसेवक सलीम अन्वर बारबटीया उर्फ सलीम मेमन यांची आठ महिन्यांपुर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सराईत गुन्हेगार व मुंबईच्या छोटा राजन टोळीचा हस्तक जयराम श्रावण लोंढे (रा.गांधीधाम, देवळाली गाव) यास नाशिकच्या गुन्हे शाखा युनीट-२च्या पथकाने सापळा रचून राहत्या घरातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
नानी दमणमधील समुद्रकिनारी असलेला एक भुखंड रिकामा करण्याची सुपारी तेथील एका मोठ्या व्यावसायिकाने छोटा राजन टोळीला मुंबईत मिळाली होती . या टोळीसाठी काम करणारा लहान दमणमधील समुद्रकिनारी असलेला भुखंड रिकामा करण्याची सुपारी घेतल्यानंतर जयराम याच्याशी संपर्क साधून तेथील दुचाकी शोरुमचे मालक सलीम बारबटीया यांची हत्या करण्याचे 'टार्गेट' देण्यात आले. जयरामने कल्याणच्या काही सराईत गुंडांची मदत घेत आठ महिन्यांपुर्वी संध्याकाळच्या सुमारास शोरुममध्ये बळजबरीने प्रवेश करत गोळीबार करुन बारबटिया यांना ठार मारले होते. तेव्हापासून जयराम हा फरार होता. तो काही महिन्यांपुर्वी नाशकातदेखील येऊन गेला; मात्र पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याने देवळालीगावातील एका ट्रकचालकाला मॅनेज करुन ट्रकवर क्लिनर म्हणून थेट चेन्नई गाठले होते. दसऱ्याला तो पुन्हा नाशकात येतात पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
दसऱ्याचा मुहुर्त अन् हातात पडल्या बेड्या
चेन्नईत काही काळ वास्तव्य केल्यानंतर जयरामने दसऱ्याच्या मुहुर्तावर 'सिमोल्लंघन' करत नाशिकमधील देवळाली येथील राहत्या घरी हजेरी लावली. याबाबतची गोपनीय माहिती गुन्हेशाखेतील सहायक पोलीस उपनिरिक्षक श्यामराव भोसले यांना त्यांच्या खबऱ्याकडून खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिनेश बर्डेकर यांना माहिती दिली. भोसले यांच्यासह हवालदार देवकिसन गायकर, शंकर काळे, राजेंद्र घुमरे, अन्सार सय्यद यांच्या पथकाने सापळा रचुन जयरामला त्याच्या गांधीधाम येथील राहत्या घरातून दसऱ्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.