नाशिक : राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे असल्याने नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू शकतात आणि भाजपच्या नगरसेवकांत फोडाफोडीचे राजकारण होऊ शकत असल्याने त्यामुळे पक्षाने विशेष दक्षता घेतली असून, सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) अज्ञातस्थळी नेण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या सर्वांची जबाबदारी पक्षाच्या तीन आमदारांना देण्यात आली आहे.महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. या पक्षाचे ६५ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षांतील सर्व पक्ष एकत्र आले तरी भाजपला सत्तेवर खेचण्यासाठी आणखी काही नगरसेवकांची गरज आहे. भाजपत सध्या राजी नाराजीचे वातावरण असून, काही जण हे पक्षाने उमेदवारी नाकारलेले आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असल्याने भाजपलादेखील निवडणूक आव्हानात्मक आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यास नाशिकमध्ये मिशन शिवआघाडी राबविले जाऊ शकते हे लक्षात घेऊन भाजपच्या वतीने जोरदार तयारी सुरू झाली असून, सर्व नगरसेवकांना शहराबाहेर नेण्याची तयारी करण्यात आली आहे.भाजपतील काही इच्छुकांनी शुक्रवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) सकाळी रामायण येथे बोलविण्यात आले असून, तेथून सर्वांना घेऊन अज्ञात ठिकाणी सहलीवर नेण्यात येणार असून, त्याठिकाणी भक्कम तटबंदी उभारली जाणार आहे. सध्या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार असल्याने नगरसेवकांना सहलीवर नेणे आणि त्यांना निवडणुकीपर्यंत सांभाळणे याची जबाबदारी पक्षाच्या आमदारांवर देण्यात आली असून, त्यामुळेच आता भाजपची सत्ता वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.महासभेचे काय होणार?महापौर रंजना भानसी यांच्या कारकिर्दीतील शेवटची महासभा येत्या मंगळवारी (दि.१९) होणार आहे. मात्र या सभेसाठी भाजपचे मोजकेच पदाधिकारी आणि इच्छुक वगळता कोणीही हजर असणे कठीण आहे त्यामुळे ही सभा बोलवल्यानंतर कशी चालवली जाणार या विषयी शंका आहे. विशेषत: या सभेतच शिक्षण समितीचे नऊ सदस्य घोषित केल्यानंतर मनपाची सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात येण्यासह अन्य प्रशासकीय विषय असणार आहेत.
फोडाफोडीच्या धास्तीने भाजप नगरसेवक आज सहलीवर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:26 AM