लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर राष्टÑवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. भुजबळ यांनी संजय राऊत यांना उद्देशून ‘यांनी सरकार घालविलेच’ असे गौरवोद्गार काढले, तर राऊत यांनी आपल्या भाषणात, भुजबळ यांनी विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या कामकाजाची पद्धती विद्यमान विरोधी पक्ष नेत्यांनी अवलंबली तर महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चांगले काम करेल व त्यांचे विरोधी पक्ष नेतेपदही शाबूत राहील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच संयुक्त महाराष्टÑाच्या लढ्यापासून केली. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे ही लढाई लढणारे जे पाचरत्ने होती, त्यातील आचार्य अत्रे व त्यांचे वृत्तपत्र ‘मराठा’ या दोघांची भूमिका ‘संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे’ अशी आवर्जून मागणी होती. तशीच मागणी किंबहुना घोषणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांची होती. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, झालाच पाहिजे’ असा त्यांनी जो काही धोशा लावला होता, ते पाहून मला आज ‘मराठा’ची आठवण तर झालीच, परंतु शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांनी मोठी हिंमत दिली व त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे सरकार घालविण्याची मोठी लढाई आपण जिंकलो’ अशा शब्दात भुजबळ यांनी राऊत यांचे कौतुक केले. तर संजय राऊत यांनीदेखील आपल्यातील पत्रकार अद्याप कायम असल्याचे सांगत, ‘सरकार एकीकडे तर आम्ही दुसरीकडे कायम असतो. कारण विरोधी पक्षात असताना कशी मजा असते ते छगन भुजबळ यांनी चांगलेच अनुभवले आहे. त्यांची कामकाजाची पद्धती सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजावून सांगितली तर राज्यात चांगले वातावरण निर्माण होईल. सरकारही पाच वर्षे चांगले काम करेल व विरोधी पक्ष नेतेपदही कायम राहील’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. भुजबळ यांनी दिल्लीत महाराष्टÑ सदनाची देखणी व भव्य वास्तू बांधली आहे, त्यावेळी भुजबळ यांच्यावर टीका होत असताना मी एकटाच त्यांच्या बाजूने बोलत होतो. राज्य सरकारचा एक रुपयाही खर्च न होता भव्य वास्तू त्यांनी बांधली, तशीच वास्तू आता जिल्हा परिषदेने उभारावी. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार असल्याने सरकार सहा महिनेच चालेल असे जे काही म्हटले जाते, त्यात कोणतेही तथ्य नाही. उलट ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे तर चालेलच, परंतु आगामी पंचवीस वर्षेदेखील उत्तम कामगिरी करून देशात महाराष्टÑाचा नावलौकिक वाढवेल, असे राऊत म्हणाले.