दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अखेर मोदींची लाट नसली तरी मतदारांनी मोदींनाच पुन्हा एकदा संधी दिली. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांना निर्विवाद बहुमत मिळाले. चांदवड विधानसभा मतदारसंघात डॉ. भारती पवार यांनी एकतर्फी बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. शेतीप्रश्न, बाजारभाव, नोटाबंदी, पाणीसमस्या, जीएसटी आदी मुद्दे चांदवड विधानसभा मतदारसंघात कळीचे ठरविले गेले. त्यादृष्टीने चांदवड व देवळा मतदारसंघात कॉँग्रेस व राष्टवादी कॉँगे्रसने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असला तरी, मतदारांनी नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर मत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनी बाजी मारली, त्यावेळीही मोदी लाट कामी आली. तेव्हापासून डॉ. आहेर यांनी मतदारसंघात आपल्या वेगळ्या कामाचा ठसा उमटविला. म्हणूनच चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांना एकतर्फी आघाडी मिळाली. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाविषयीची भूमिका मतदारांना सकारात्मक वाटल्याने त्याचाही मतदानावर परिणाम झाला.कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेस निवडणुका तोंडाशी आल्या म्हणूनच प्रचारयंत्रणा राबविताना दिसली. त्यांच्या प्रचारातील नियोजनाचा ढिसाळपणाही समोर आला. या उलट भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत प्रचाराचे नियोजन केल्याचे प्रचार यंत्रणेत दिसून आले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविषयी असलेली नाराजी लक्षात घेऊन ऐनवेळी डॉ. पवार यांना दिलेली उमेदवारीही भाजपसाठी फायदेशीर ठरली.या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणामआगामी विधानसभेच्या निवडणुका अवघ्या चार -पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या असून, या निवडणुका वेळेत झाल्यास फारसा परिणाम महाराष्टÑात होणार नाही. विधानसभेतही पुन्हा मोदी लाटच सर्वत्र दिसेल. त्याचा भाजप-शिवसेना युतीला फायदा होईल, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडतील. मात्र विकासकामे व मोदी फॅक्टर पुन्हा जोर धरेल. त्याच दिशेने भाजप-सेना प्रचाराचे नियोजन करेल. त्यामुळे तालुक्यात विधानसभेची गणिते फारशी बदलणार नाहीत.
भाजपाने मारली एकतर्फी बाजी; आघाडीच्या मनसुब्यावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:14 AM