नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिकमध्ये आणून परिषद भरवतानाच आयटी पार्कच्या भूमिपूजनाची तयारी सत्तारूढ भाजप करीत असला तरी इतक्या घाईने सोपस्कार करण्यास आयुक्त तयार नाहीत. त्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. सत्तारूढ भाजपने वेळेत प्रकल्प मंजूर करूनही प्रशासनाकडून सत्वर कार्यवाही तर झाली नाहीच उलट आताही निवडणुकीच्या तोंडावर टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेची निवडणूक तोंडावर असून, त्यामुळेच सत्तारूढ भाजपकडून आयटीपार्क, लॉजिस्टीक पार्क आणि बीओटीवरील भूखंंडांचा भूमिपूजन करण्याची तयारी आहे. आडगाव शिवारात खासगी सहभागातून आयटी हब साकारण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी धावपळ करीत असून, त्याच अनुषंगाने केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना १ मार्चला निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत आयटी कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही परिषद भरविण्यात येणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केले असले तरी त्यासाठी प्रशासकीय पातळीवर काहीच तयारी नाही. किंबहुना महापालिकेकडून ही परिषद भरविण्यात येणार नसल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले. मुळातच आयटी प्रकल्प साकारण्यासाठी जमिनीचे देकार मिळाले असले तरी त्यासंदर्भातील अनेक प्रकारची कायदेशीर कार्यवाही पूर्ण झालेली नाही. अशावेळी नाशिकमध्ये येऊ घातलेल्या कंपन्यांना प्रकल्पाची कोणती तयारी दाखविता येईल असा प्रश्न आहे.
दुसरीकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वकच राजकीय दबावातून भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयटी पार्क हा महापालिकेचा आणि महापालिकेला भरीव उत्पन्न देणारा प्रकल्प असून, त्यामुळेच तो साकारला जाणार आहे. यासंदर्भात वर्षभरापासून कार्यवाही सुरू असून, त्याचे प्रस्ताव, सल्लागार नेमणे, तज्ज्ञांची समिती नियुक्त करणे ही सर्वच कामे प्रशासनाने केली आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर घाई केली जात असल्याचे खरे नाही असे स्पष्ट केले.
इन्फो..
बीओटीवरूनही वाद
महासभेत २२ भूखंड बीओटीवर देण्याची तयारी केली असली तरी प्रशासनाने गंगापूररोडवर मॅग्नम हार्ट जवळलील जागा आणि मधुर स्वीट समोरील भूखंड अशा जागांचे देकार मागविल्यानेदेखील वाद सुरू झाला आहे.