इगतपुरी : आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्यानुसार आमची भूमिका राहणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्तेची सूत्र काँग्रेसकडेच राहतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिर सांगताप्रसंगी सांगितले. दरम्यान, पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली व गावगुंडांना गावगुंडच दिसणार असल्याचा टोला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.
इगतपुरीत रेन फॉरेस्ट रिसोर्ट येथे मुंबई प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिराची सांगता रविवारी (दि. २३) झाली. यावेळी नाना पटोले यांनी मार्गदर्शन करत पक्षाची भूमिका विषद केली. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले, मोदी सरकारने जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारल्याने देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. महागाईमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले असून, केंद्रातील सरकार सपशेल फेल झाले आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल. भाजप व शिवसेनेची गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता राहिली आहे. मात्र, आगामी निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्या पद्धतीने आम्ही भूमिका ठरवू. महाराष्ट्राची ओळख ही बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली आहे. म्हणून मी त्यांच्या प्रत्येक जयंतीदिनी अभिवादन करतो. राजकारण हे परिवर्तनवादी असते, बाळासाहेबांना धोकेबाज लोक कधीच आवडत नव्हते आणि ज्यांनी त्यांच्याशी धोका केला ते त्यांना जवळही उभे करत नव्हते. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार हिरामण खोसकर, संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे आदी उपस्थित होते.
इन्फो..
...तर शेतकऱ्यांची वीजजोडणी चालू ठेवू
ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शेतकऱ्याची वीज कापल्याशिवाय पर्याय नाही, असे बोलले असता यावर भाजपने टीका केली. मात्र, २०१७पासून भाजपने केलेले पाप आमच्या शेतकऱ्यांच्या उरावर आहे. भाजपच्या काळात जे नुकसान झाले त्याचे परिणाम शेतकरी भोगतोय. मात्र, विधानसभेत याविषयी चर्चा झाली असून, फक्त चालू बिले भरली तरी शेतकऱ्यांचे कनेक्शन कायम चालू ठेवण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही पटोले यांनी दिली.