नाशिक- लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी काल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे जाऊन शक्ती प्रदर्शन केले होते. त्याला 24 तास उलटत नाही तोच नाशिकमधील भाजपाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि चार आमदार हे मुंबईत पोहोचले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी तळ ठोकून आहेत.
नाशिकमध्ये भाजपाची ताकद अधिक असून त्यामुळे ही जागा भाजपाला सोडावी या मागणीसाठी आमदार आणि सर्व इच्छुक आक्रमक झाले आहेत यापूर्वी नाशिक मध्ये पक्षाचे संघटन मंत्री विजय चौधरी आल्यानंतर त्यांनी पक्षकार्याल्यातच आंदोलन केले होते. दरम्यान, काल शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी ठाणे येथे उड्डाणपुलाखाली ठाण मांडले आणि रात्री उशिरा दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिकची जागा शिंद गटाकडेच ठेवावी, म्हणजेच राष्ट्रवादी आणि भाजपला सोडू नये अशी मागणी केली होती. नाशिकच्या जागेबाबत आपण बाजू लावून धरू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिले होते. त्यानंतर आज भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार ऍड. राहुल ढिकले आणि डॉ राहुल आहेर या चार आमदारांबरोबरच लोकसभा प्रमुख केदा आहेर, दिनकर पाटील, महेश हिरे, गणेश गीते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी तळ ठोकला आहे.
दरम्यान, काही वेळाने उपमुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांची सर्व पदाधिकारी भेट घेणार आहेत.