इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. या प्रमुख मागणीसाठी इगतपुरी आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. रविवारी (दि.३१) संपाला इगतपुरी भाजपा युवा मोर्चा व भाजपा पदाधिकाऱ्यानी पाठिंबा देत इगतपुरी आगाराला कुलूप लावले.
राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या तीन दिवसांपूर्वी उशिरा मान्य केल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून इगतपुरी आगारातील एसटीची चाके फिरलीच नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. जवळपास इगतपुरी आगारातील २८५ सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. राज्यभरात आतापर्यंत २७ कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ते कुटुंब रस्त्यावर आले आहेत. एसटी कामगारांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या बाबतीत अनास्था दाखवत राज्य शासन दुजाभावाची वागणूक देत आहे. त्याला कंटाळून इगतपुरी आगारातील वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. इगतपुरी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे सकाळपासून एकही एसटी बस रस्त्यावर धावली नाही. गेल्या तीन दिवसांपासून एसटी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांचे एक वेळचे जेवण येथेच चूल पेटून केले जात आहे.