नाशिक : कॉँग्रेस पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात आहेत, या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर टीका करणारे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दानवे यांनी खुले आव्हान दिले आहे. कॉँग्रेस हे बुडते जहाज असल्याने तेथे आपण जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असे सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी कॉँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असे सांगत त्यांनी शड्डु ठोकला. कॉँग्रेसचे एकवीस आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावर टीका करताना कॉँग्रेस प्रदेश माणिकराव ठाकरे यांनी मंत्रिपद जाणार असल्याने दानवे हेच कॉँग्रेसच्या संपर्कात असल्याची टीका केली होती. त्यावर पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी हे आव्हान दिले. माझा जन्म भाजपात झाला आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच मी ३५ वर्षे काम करतो आहे. सरपंचपदापासून कामे करताना कधी आमदार किंवा खासदार मंत्री होईल असे वाटले नव्हते. राज्यात पहिल्यांदा युतीची सत्ता आली तेव्हा मी आमदार होतो. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा आपण खासदार होतो, परंतु मंत्री नव्हतो. त्यामुळे आपल्याला लाल दिव्याचा मोह नाही, असे सांगून दानवे म्हणाले की कॉँग्रेस हे बुडते जहाज असल्याने त्यात बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यात भाजपा आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद असल्याचे त्यांनी इन्कार केला. दोन्ही पक्ष स्वतंत्र असल्याने दोन्ही पक्षांचे मंत्री येतात तेव्हा त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित असतात हे स्वाभाविक आहे, असे सांगून त्यांंनी फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे ते म्हणाले.
भाजपाचे आमदार फोडा, नाही तर कॉँग्रेसचे फोडून दाखवतो रावसाहेब दानवे : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांना थेट आव्हान
By admin | Published: February 08, 2015 12:36 AM