लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी चालविली असून, त्यात भारतीय जनता पक्षाने चांगलीच आघाडी घेतली, तर राष्टÑवादीनेही तयारीला वेग दिला आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी नाशकात येऊन चाचपणी केली असली तरी, शिवसेना व कॉँग्रेसमध्ये सामसूम असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हायकमांडच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून, राजकीय पक्षांबरोबरच प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांनी तयारी चालविली आहे. एकेका मतदारसंघात दोनपेक्षा अधिक इच्छुक असून, विशेष करून सत्ताधारी भाजपा व शिवसेनेत इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. या इच्छुकांना पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल अशी ठाम खात्री असल्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून त्यांनी आपल्या पातळीवर प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेतला जात आहे. पक्ष श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्याबरोबरच गॉड फादर करवी उमेदवारीसाठी फिल्ंिडगही लावली जात आहे. सर्वच पक्षांनी अशा इच्छुकांना हवा देऊन वातावरण तापविण्यास अप्रत्यक्ष हातभारच लावला. चालू आठवड्यात राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधूनच आपल्या राज्य दौ-याला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी नाशकात मुक्काम ठोकून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची चाचपणी व इच्छुकांचे मत अजमावणी केली. पवार यांची पाठ फिरताच, भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचे नाशकात आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन दिवस नाशकात तळ ठोकत निवडणूक पूर्व तयारी केली. प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाचारण करून भाजपाने नारळही फोडून घेतला. अन्य पक्षांमध्ये मात्र अद्यापही शांतता आहे. नाही म्हणायला गेल्या महिन्यात कॉँग्रेसच्या निवडणूक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशकात येऊन जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या व लवकरच यादी जाहीर करू, असे आश्वासन दिले. इच्छुक मात्र अजूनही यादीची प्रतीक्षा करीत आहेत. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या महिन्यात पक्षाच्या पदाधिका-यांनी नाशकात येऊन उमेदवारांची चाचपणी केली आहे.केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेत मात्र स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या दृष्टीने काही तयारी दिसली नाही. मध्यंतरी उत्तर महाराष्टÑाचे संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस दौ-यावर येऊन पदाधिका-यांच्या बैठका घेतल्या व काही लोकार्पणे केली. परंतु शिवसेनेत सर्व निर्णय ठाकरे कुटुंबीयांकडूनच घेतले जात असल्यामुळे निवडणुकीपूर्वी नाशिक दौरा करून त्यांच्याकडून आढावा घेतला जाण्याची अपेक्षा होती. तसे झालेले नाही. इच्छुकांनी मातोश्री दरबारी हजेरी लावून आपल्या इच्छा प्रदर्शित केल्या असल्या तरी, जोपर्यंत भाजपाबरोबर युतीचा फैसला होत नाही तोपर्यंत शिवसेनेत शांतता राहील असे सूत्रांनी सांगितले.